उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दि. 17 मे 2022 रोजी जिल्हा रुग्णालय आणि अधिनस्त उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये,  स्त्री रुग्णालय  तसेच  प्रा.आ.केंद्र  येथे जागतिक उच्च रक्तदाब दिना निमित्त्‍ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या वर्षाचे घोषवाक्य “उच्च रक्तदाब आपल्या रक्तदाबाची नियमित तपासणी करून घ्या, नियमित व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवा” असे आहे.

 उच्च रक्तदाब :- उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्कतदाब होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे तंबाखू आणि दारूचे व्यसन, अति मानसिक ताण, आनुवंशिक कारणे, आहारात जंक फूड किंवा फास्ट फूडचा समावेश, आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली, चिंता, राग, भीती इत्यादी मानसिक विकार, वजन जास्त असणे, व्यायामाचा अभाव आणि स्थूलता.

 उच्च रक्तदाबाने शरीरावर होणारे दुष्परिणाम :- उच्च रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो, तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच अर्धांगवायू (लकवा) असे म्हणतात.लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते. वेळीच औषधोपचार चालू न केल्यास आणि  नियमित औषधे न घेतल्यास मुत्रपिंड, डोळे तसेच हृदय या अवयवांच्या बाबतीत गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होऊ शकते आणि कायमचे दोष निर्माण होऊ शकतात.उच्च रक्तदाबाबरोबर इतर रोग असल्यास (उदा. मधुमेह, मुत्रपिंडाचे रोग) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.  

 उच्च रक्तदाब नियंत्रणाची पंचसूत्री:  नियमित औषधोपचार, समतोल आहार आणि मीठ सेवन मर्यादित करणे, नियमित व्यायाम,  वजन नियंत्रित करणे आणि ताण-तणाव कमी करणे.

 उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक करा:-  रोज चालण्याचा व्यायाम करा.(रोज२०मिनीटे) योग्य आहार घ्या.  जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करा तसेच तळलेले पदार्थ, बटरयुक्त पदार्थ, खारट पदार्थ, लोणचे, फरसाण इत्यादी पदार्थाचे सेवन टाळा. कोणत्याही प्रकारे तंबाखूचेसेवन, धुम्रपान तसे मद्यपान सेवन टाळा. ५) डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नियमितपणे औषधे घ्या.  ६) नियमित योगा,प्राणायाम,आनापाना करा.

 मागील वर्षात उस्मानाबाद जिल्हयात आढळून आलेले उच्च्‍ रक्तदाबाचे रुग्ण

 एकूण तपासणी केलेली रुग्ण संख्या एक लाख 79 हजार 71 (पुरुष-76,929 आणि महिला- 102142), नियमित उपचाराखालील रुग्ण संख्या 26 हजार 817 (पुरुष- 12,201 आणि महिला- 14616), फक्त उच्च रक्तदाबाचे रुग्ण एक हजार 940 (पुरुष- 516 आणि महिला- 1424), उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्ण संख्या- 362 (पुरुष- 181 आणि महिला- 181) आणि ऱ्हदय विकार आढळून आलेले रुग्ण-110 (पुरुष- 57 आणि महिला- 53).

  जिल्हयातील सर्व नागरीकांनी आपल्या जवळच्या शासकिय रुग्णालयात जावून आपल्या आरोग्याची तपासणी “असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत”मोफत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी केले आहे.

 
Top