उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात द्वैभाषीक अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती विभागाची पुस्तकही प्राप्त झाली आहेत. या अभ्यासक्रमाच्या शिकवणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे (डायट) ने 2022 वर्षाचे शैक्षणिक कामकाजाचे नियोजनही केले आहे. जिल्ह्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसेच त्यांच्यात विविध विषयांशी संबंधी क्षमता विकसित व्हाव्यात, यासाठी यापुढे जिल्ह्यात विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे प्रशिक्षणही घेतले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिली.

जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी आणि डायटचे अधिकारी यांनी द्वैभाषा शिक्षण अभ्यास क्रमाची पुस्तके आणि वर्षभराच्या शैक्षणिक कामकाजाच्या नियोजनाची माहिती दिली, तेंव्हा श्री.दिवेगावकर बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत द्वैभाषा अभ्यासक्रम राबविण्याबाबत करण्यात आलेल्या तयारीवरही चर्चा झाली.

दरम्यान, जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांतील संकल्पना समजाव्यात, त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, त्यांची इंग्रजी, गणित आदी विषयांबाबतची भीती दूर व्हावी आणि इतरही विषयांत त्यांचा रस वाढवून एक उत्तम नागरिक तयार करण्याचे काम करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या काही विषयातील क्षमतावरही नकारात्मक परिणाम झाला आहे, तोही दूर करण्याची गरज आहे, असेही मत व्यक्त करुन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधान जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. स्त्री-पुरुष समता वाढीस लावण्यासाठी लिंग भेद घालण्याचे उपक्रम हाती घेण्यात येणार असून या अंतर्गत “आज ताट कुणी उचललं” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून मुला-मुलींमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे.

गणिताच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करुनही दृकश्राव्य माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इंग्रजी भाषेतील शब्द संग्रहाचे पाठांतर वाढवून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शब्द संग्रह करण्याचा छंद वाढवून त्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यात येईल. यासाठी परिपाठाच्या वेळेचा योग्य वापर करण्यात येईल. इतिहास हा विषय रंजक पध्दतीने सांगण्यासाठी संदर्भीय ग्रंथ उपलब्ध करुन दिले जातील. त्यासाठी विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाईल. भूगोल विषयासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यासाठी गुगल अर्थचा वापर करुन भूगोलाबाबत विद्यार्थ्यांत आवड निर्माण केली जाईल. वैज्ञानिक प्रयोगाची आवड निर्माण करण्यासाठी विज्ञानप्रदर्शने भरविली जातील. पाठ्यपुस्तकातील जुन्या कथा, कवितांचे वाचन वर्गातून करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातील. विद्यार्थ्यांमधील विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, कविता वाचण्याच्या स्पर्धा घेण्यात येतील. द्वैभाषीक शिक्षणासाठी एक ॲप विकसित करण्याचे काम जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षक आणि तंत्रज्ञानांच्या मदतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे येत्या 31 मे 2022 रोजी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, अशीही माहिती श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिली.

 
Top