उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दोन दिवसांपूर्वी आयजी एम. प्रसन्ना यांच्या आदेशाने बीडच्या पोलिसांनी शहरात येऊन सुरु असलेल्या जुगाराच्या गोरख धंद्यावर कारवाई केली होती. त्याच दिवशी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत शुक्रवारी १२ ठिकाणी अवैध मटका जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकून साडेसहा लाख रुपये, जुगार साहित्यासह ४४ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात रविवारी दिली.

जुगार विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हेही नोंदवले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद (श.) पोलिसांनी अजिंक्य आडसुळ, ऋषिकेश शिंदे हे दोघे पाथ्रुड गल्ली येथे चक्री मटका जुगार चालवताना आढळले. त्यांच्याकडून एक लाख १५ हजार ५०० रुपये आणि जुगार साहित्य जप्त कले. दुसऱ्या घटनेत मार्केट यार्ड परिसरात नितीन पोतदार यांसह तीन पुरुष ऑनलाइन विन गेम जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह एक लाख ३५ हजार ४८० रुपये जप्त केले. तिसऱ्या घटनेत ललित नेताजी पवार यांसह तिघे हे मार्केट यार्ड परिसरात मटका जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून २५ हजार ७०० तर दत्ता मुदे यांसह चौघे पाथ्रुड गल्ली परिसरात ऑनलाइन मटका जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ७१ हजार ६२५ रुपये जप्त केले. सरफराज मुजावर यांसह सात पुरुष जनता बँकेसमोर ऑनलाइन वन प्लस मटका जुगार खेळताना आढळले त्यांच्याकडून साहित्य व ६२ हजार रुपये जप्त केले. आनंदनगर पोलिसांना निलेश चपने यांसह पाच पुरुष हे ऑनलाइन वन प्लस मटका खेळताना आढळले त्यांच्याकडून ५९ हजार २८० रुपये, गणेश गाडे यांसह दहा पुरुषांकडून एक लाख आठ हजार ५४० रुपये तर जमीर तांबोळी यासह चार पुरुष हे तुळजाभवानी संकुलासमोर पत्रा शेड समोर मिलन नाइट मटका जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह २३ हजार  १९० रुपये जप्त केले. कळंब पोलिसांनी दिलीप शिवमुर्ती, हारुन शेख, सुधीर कदम, महादेव पेठे, शंकर सावंत हे तीन वेगवेगळ्या ठिकाणी मटका जुगार चालवताना आणि खेळताना आढळले. त्यांच्याकडून ४४ हजार ११० रुपये जप्त केले. वाशी पोलिसांनी सिकंदर शेख यांना पारगावात मटका जुगार साहित्यासह ३६० रुपये जप्त केले. परंडा पोलिसांनी समीर अरब यांच्याकडून १४ हजार २५० रुपये, येरमाळा पोलिसांनी शिवराम ईटकर हे येडेश्वरी कमानी जवळ कल्याण मटका चालवताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह एक हजार १२० रुपये जप्त केले.

 
Top