उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर महाराष्ट्रातही पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच सक्रीय झाले असून उस्मानाबादमध्ये राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत पहिलाच मेळावा घेण्यात येणार आहे. आज शनिवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता परिमल मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात येत आहे. याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दिपक सिंघला, गोव्याचे माजी उद्योग मंत्री तथा राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य संयोजक रंगाआण्णा राचुरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. पक्षाची जिल्ह्यातील पुढील दिशा व रणनिती ठरवण्याच्या दृष्टीकोनातून व पक्ष वाढीसाठी मेळावा महत्वाचा ठरणार आहे. यावेळी अन्य पक्षांच्या नेते व कार्यकर्ते पक्षात प्रवेश घेणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. अजित खोत यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाध्यक्ष अॅड. खोत यांनी कावळेवाडीतील ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा जिल्ह्यात पहिल्यांदाच फडकावला होता. तेथील शाळांचा त्यांनी कायापालट केला आहे. शाळेची पाहणी करण्यासाठीही राज्यस्तरीय पदाधिकारी येणार आहेत.


 
Top