उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देवकुरुळी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, उस्मानाबाद या जागरी पावडर प्रकल्पाची चाचणी हंगामाची सांगता काल संपन्न झाली.

चाचणी हंगामामध्ये ६१००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याने आपला चाचणी गळीत हंगाम यशस्वी केला आहे. या १२२ दिवस चाललेल्या चाचणी हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे बिल दर १५ दिवसाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकरकमी जमा करण्यात आले. तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब या भागातील ऊस कारखान्याने गाळपासाठी आणला होता. कारखाना व्यवस्थापनामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, ऊस तोडणी, वाहतूक करणारे तसेच वाहनचालक या सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चाचणी हंगामात ६१००० मेट्रिक टन उसाचे गाळप केले याबद्दल श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ता कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.

कारखान्याचा चाचणी हंगाम असल्यामुळे व अपुऱ्या वाहन, तोडणी यंत्रणा व मजुरांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे कारखान्याला चाचणी हंगाम लवकर संपवावा लागला. पुढील हंगामाचे नियोजन उत्तम पद्धतीने करून अधिकाधिक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी कसा आणता येईल याचे नियोजन कारखाना व्यवस्थापन चालू हंगामात करेल असे श्री.दत्ता कुलकर्णी यांनी सांगीतले.

चाचणी हंगाम यशस्वी करण्यासाठी मदत केलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक यंत्रणा, वाहनमालक, मुकादम, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व हितचिंतकांचे श्री.दत्ता कुलकर्णी यांनी आभार मानले.


 
Top