उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे वैराग्य महामेरू श्रीसंत गोरोबाकाका समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, तुकोबराया गाथा पारायण व गोरोबा काका चरित्र कथा सोहळ्यास बुधवारी (दि़२०) विधीवत मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला़ ७ दिवस हा धार्मिक सोहळा रंगणार आहे़
सारोळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही श्रीसंत गोरोबा काका समाधवी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्रीसंत तुकोबाराय गाथा पारायण व गोरोबा काका चरित्र कथा सोहळ्यास बुधवारी विधीवत प्रारंभ करण्यात आला़ सरपंच प्रशांत रणदिवे, माजी जि़प़ सदस्य अॅड़ शामसुंदर सारोळकर, धैर्यधर पाटील, भागवत साठे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, सोसायटीचे लिपिक धनंजय साठे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर देवगिरे, सोसायटीचे संचालक अरूण मसे, संदीपान देवगिरे, सप्ताह सोहळ्याचे प्रमुख ह़भ़प़ महादेव महाराज कासार आदींच्या हस्ते कलश, गाथा, टाळ, मृदंग पूजन करण्यात आले़ सप्ताहात ह़भ़प़ बाबुराव जावळे महाराज, आळंदी यांची बुधवारी रात्री किर्तन सेवा झाली़ सप्ताहात नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन ह़भ़प़ महादेव कासार महाराज व सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे़
यांची होणार कीर्तनसेवा
सप्ताहात बुधवारी ह़भ़प़ बाबुराव जावळे महाराज यांची तर गुरूवारी ह़भ़प़ पांडूरंग माळी महाराज, शुक्रवारी ह़भ़प़ मुकूंद महाराज देवगिरे, शनिवारी ह़भ़प़ नवनाथ महाराज, रविवारी ह़भ़प़ एकनाथ पाटील महाराज, सोमवारी ह़भ़प़ प्रभाकर दादा वाघचौरे, मंगळवारी ह़भ़प़ देविदास महाराज यांची तर बुधवारी ह़भ़प़ पुरूषोत्तम मुंडे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे़ तसेच भाविकांना महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार आहे़