उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणार्‍या खामगाव-पंढरपूर महामार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने होत असून येरमाळा येथे मातंग व बौद्ध समाजाच्या वस्तीजवळ दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तयार करण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करुनही दखल न घेतल्यामुळे 11 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन तसेच सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज (दि.9) जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सदरील मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने  यापूर्वी रास्तारोको आंदोलन करण्यात आलेले होते. तसेच वारंवार निवेदन देऊन देखील दखल घेतली गेली नाही. उलट रस्त्याचे काम करणार्‍या मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून जिवे मारण्याची धमकी संघटनेचे पदाधिकारी रोहीत खलसे यांना दिल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

येरमाळा शहरातील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने रहदारीचा विषय असून या भागात मातंग आणि बौद्ध समाजाची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. या प्रमुख मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे सोमवार, 11 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन तसेच कोणत्याही क्षणी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी संघटनेचे रोहित खलसे, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख निखिल चांदणे,  युवक शहराध्यक्ष महेश कसबे, येरमाळा शहराध्यक्ष सागर कसबे उपस्थित होते.


 
Top