उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा व तेरणा पट्ट्यातील संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी, तसेच ऊस तोडणीसाठी त्वरीत 20 मशिन देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. आंबाजोगाई येथील एका कार्यक्रमासाठी ते शुक्रवारी (दि.8) आले असता त्यांची जिल्ह्यातील ज्वलंत विषयावर भेट घेवून निवेदनाद्वारे ही मागणी केली.

निवेदनात उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे 52 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. पावसामुळे ऊसाचे दुप्पट उत्पादन झाल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून ऊसाचे संपुर्ण गाळप होवू शकत नाही. शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्याबाहेरील 50 ऊसतोड मशिन व 140 लेबर टोळ्यांमार्फत दररोज 3.50 ते 4 हजार मे.टन ऊस जिल्ह्याबाहेरील कारखान्यांकडे जात आहे. एवढी यंत्रणा वाढवूनही 30 मे 2022 पर्यंत कारखाने चालू राहिले तरीदेखील मांजरा-तेरणा पट्ट्यातील एक लाख मे टन ऊस शिल्लक राहण्याची परिस्थिती आहे.

शेतकर्‍यांकडील ऊसाची लागन 17 ते 18 महिने होऊन गेल्यामुळे शेतकरी असवस्थ असून ऊसतोड मशिन मालक व टोळी मालक यांच्यामागे शेतकरी ऊस घेवून जाण्यासाठी दिवसरात्र बसून आहेत. ऊस घालविण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होत असून शेतकर्‍यांमध्येच ऊस घालविण्यामध्ये मारामारीचे प्रकार गावोगाव होवू लागले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी व समान ऊसतोड कार्यक्रम होण्यासाठी शासकीय नोडल ऑफिसरची नेमणूक करणे तसेच ऊस तोडणीसाठी 20 मशिन आवश्यक आहेत. ज्यामुळे परिसरातील ऊसतोड सुरळीत होईल व शेतकर्‍यांमध्ये वाद होणार नाहीत. तसेच शासनाला ऊसाच्या संदर्भात अचूक माहिती उपलब्ध होईल. याकामी आपण संबंधितांना आदेशीत करुन उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा संपुर्ण ऊस गाळप होण्यासंदर्भात आश्वासित करावे, अशी विनंती संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.


 
Top