तेर/  प्रतिनिधी 

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता .उस्मानाबाद येथील वारकरी संप्रदायातील थोर संत श्री .संत गोरोबा काकांच्या वार्षिक समाधी सोहळ्यानिमित्त श्री. संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना या महाभयंकर महामारीमुळे गेली दोन वर्षे गोरोबा काकांचा वार्षिक समाधी सोहळा रद्द करण्यात आला होता .परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तसेच राज्य सरकारने कोरोना काळात लावलेले अनेक निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदा मात्र संत गोरोबा काकांचा वार्षिक समाधी सोहळा होणार असल्याचे  मंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी पी. बी. भोसले व  व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी सांगितले .

तेर ता. उस्मानाबाद येथील वैराग्य महामेरू श्री. संत गोरोबा काकांचा ७०५ वा समाधी सोहळा चैत्र वद्य दशमी ते चैत्र वद्य चतुर्दशी शके १९४४ म्हणजेच दिनांक २५ ते २९  एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे या उत्सवादरम्यान भजन कीर्तन प्रवचन पालखी मिरवणूक गोपाळकाला असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सोमवार दिनांक २५ रोजी महाराष्ट्रातील विविध संत महंतांच्या शेकडो वारकरी दिंड्याचे तेर नगरीत आगमन व परंपरेप्रमाणे भजन प्रवचन कीर्तन उत्सवास प्रारंभ  व  रात्री ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे किर्तन ,  दिनांक २६ रोजी वरुथिनी एकादशीनिमित्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महापुजा, आरती झाल्यानंतर  संत गोरोबा काकांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा ह.भ.प. दिपक महाराज खरात यांचे प्रवचन तर ह.भ.प श्री बाळासाहेब महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा व गोरोबा काकांच्या पारंपारिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरी जागर, दिनांक २७ रोजी द्वादशी निमित्त तेरकराची पारंपरिक कीर्तन सेवा व परिसरातील सर्व वारकऱ्यांचा सामुदायिक हरिपाठ ह.भ.प अर्जुन महाराज लाड यांचे प्रवचन तर ह.भ.प. शंकर महाराज धोबडे यांची कीर्तन सेवा व हरी जागर, दिनांक २८ रोजी ह.भ.प .त्रयोदशीला गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. दत्तात्रय महाराज आंबीरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर गुलाल व पुष्प उधळण तर रात्री कान्होबा महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा व पारंपरिक वारकऱ्यांचा सामुदायिक हरी जागर तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे प्रवचन , दिनांक २९ रोजी पहाटेच्या सुमारास गोरोबा काकांच्या पालखीची छबीना मिरवणूक तसेच भगवान श्री. नृसिंह मंदिरात काल्याचे हरी कीर्तन ,गोपाळकाला व तसेच कुस्तीचा कार्यक्रम व त्यानंतर गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे असल्याने तेरसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी पी .बी. भोसले व  व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.

 
Top