उस्मानाबाद / प्रतिनिधी-
संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र अरणचा विकास व्हावा, तसेच महाराष्ट्रातील माळी समाजाचे संघटन करण्यासाठी सावता परिषदेच्या वतीने येत्या 30 एप्रिल 2022 रोजी श्रीक्षेत्र अरण (ता.माढा, जि.सोलापूर) येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आज (दि.19) पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, तसेच खासदार अमोल कोल्हे, माजी राज्यमंत्री अतुल सावे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार देवयानी फरांदे, आमदार प्रज्ञाताई सातव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
श्रीक्षेत्र अरणच्या विकासासाठी पाठपुरावा केल्यानंतर या तीर्थक्षेत्राचा ब वर्गात समावेश झाला. त्यातून मिळालेल्या निधीतून दोन कोटीची विकासकामे झाली. परंतु संतांच्या मांदियाळीत संत सावता महाराज यांचे असलेले महत्व आणि येथे येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता आणखी मोठ्या प्रमाणात येथे विकासकामे होण्याची गरज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील माळी समाजाचे संघटन व्हावे या दोन प्रमुख हेतुने मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. 2011 पासून दरवर्षी येथे मेळावा घेण्यात येत असून कोरोना काळात दोन वर्ष खंडित झालेली ही परंपरा यावर्षी पूर्वीप्रमाणे सुरू ठेवली आहे. या मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील माळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही आखाडे यांनी केले. यावेळी सावता परिषदेचे संपर्क प्रमुख शिवाजी येवारे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भाले, जिल्हा उपाध्यक्ष महादेव माळी, महेश माळी, सावता माळी, दिलीप म्हेत्रे उपस्थित होते.