‘सायक्लोथॉन’ला राज्यभरातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वेळ पहाटे साडेपाचची.. सारे स्पर्धक सायकली घेऊन सज्ज. निमित्त होते मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व फ्युचर सायकल अ‍ॅन्ड स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेचे. 25, 50 आणि 100 किलोमीटर या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत उस्मानाबादेतील आबालवृद्धांसह पुणे, मुंबई लातूर, बार्शी, सोलापूर अहमदनगर तसेच राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग नोंदवला. संयोजन समितीमार्फत केलेले नीटनेटके नियोजन आणि स्पर्धकांची व्यवस्था याचे बाहेरुन आलेल्या स्पर्धकांनी कौतुक केले.

उस्मानाबाद येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व फ्युचर सायकल अ‍ॅन्ड स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.19) सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उस्मानाबाद शहरामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली स्पर्धक मोठ्या उत्साात सहभागी झाले होते. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सायकलींग असोसिएशनचे नितीन काळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक, विधिज्ञ, डॉक्टर्स, अभिनेत्यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

उस्मानाबाद येथे आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत 100 किमी स्पर्धेत पुणे येथील सिद्धेश पाटील याने पहिला क्रमांक मिळविला. या स्पर्धेमुळे सायकलप्रेमी नागरिकांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

या मार्गांवर झाली स्पर्धा

25 किलोमीटरसाठी उस्मानाबाद वरुडा रोड ते पवारवाडी, 50 किलोमीटरसाठी उस्मानाबाद ते तुळजापूर आणि 100 किमी साठी उस्मानाबाद ते तामलवाडी या मार्गावर स्पर्धक धावले.

25 किलोमीटर स्पर्धेतील विजेते

1.नरेंद्र सोमवंशी, लातूर (50 मिनिटे 16 सेकंद), 2. हर्षवर्धन गणेश जमाले, उस्मानाबाद (1 तास 2 मिनिट 31 सेकंद), 3.राज रविकांत शितोळे, उस्मानाबाद (1तास 5 मिनिटे 14 सेकंद).

50 किलोमीटर स्पर्धेतील विजेते

1.ओंकार सरदार आंग्रे (1तास 33 मिनिटे आणि 15सेकंद), 2.श्रावण उगीले (1 तास 42 मिनिटे 26 सेकंद), 3.प्रवीण खानवले (1 तास 44 मिनिटे 50 सेकंद).

100 किलोमीटर स्पर्धेतील विजेते

1.सिद्धेश अजित पाटील,पुणे (2 तास 46 मिनिटे 1 सेकंद), 2.हनुमान यशवंतराव चोपे, पुणे (3 तास 15 मिनिट 42 सेकंद), 3.गणेश काकडे ,लातूर (3 तास 23 मिनिटे 14 सेकंद).

विजेत्यांना आकर्षक पारितोषिके

तिन्ही गटातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना सायकल, द्वितीय - स्मार्ट वॉच, तृतीय विजेत्यास जर्सी टी-शर्ट बक्षीस देण्यात आले. खासदार ओप्रकाश राजेनिंबाळकर, मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी स्पर्धा महत्वपूर्ण

मानवाचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी अशा स्पर्धा महत्वपूर्ण असतात. या स्पर्धेच्या निमित्ताने समाजात आरोग्याविषयी जागरुकता वाढून निश्चित चांगला संदेश जाईल, असे आयोजकांनी सांगितले.

यांचे लाभले सहकार्य

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व फ्युचर सायकल अ‍ॅन्ड स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन, उस्मानाबाद स्पोर्ट अकॅडमी, फिटनेस ग्रुप उस्मानाबाद, या संस्थांच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांसह पोलीस, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, पत्रकार, फोटोग्राफर, स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

सरस्वती हायस्कुलचे शिक्षक, विद्यार्थी स्वयंसेवक

उस्मानाबाद शहरातील सरस्वती हायस्कुलमधील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका निभावली. तिन्ही गटात सहभागी झालेल्या स्पर्धकांना ठिकठिकाणी त्यांची मोठी मदत लाभली.

निलंगा, अहमदपूरच्या ग्रुपचा उत्स्फुर्त सहभाग

सायक्लोथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निलंगा व अहमदपूर येथील मॅरेथॉन ग्रुपच्या सदस्यांनी देखील उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता. दोन्ही ग्रुपच्या सदस्यांचे उस्मानाबाद सायक्लोथॉन असोसिएशनने आभार व्यक्त केले.

 
Top