उस्मानाबाद  (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. त्याच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. मात्र संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना सरकारने आजपर्यंत फक्त आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही.  त्यामुळे त्यांच्या प्रांतीय अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत आहेत. त्यासाठी सर्व प्रांतीय संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जोपर्यंत सर्व एकत्र येऊन आपली एकता दाखविणार नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्या सोडविल्या जाणार नाहीत असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस धर्मवीर पालीवाल यांनी दि.२६ मार्च रोजी केले. 

अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. पंपन्ना तर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब संघटनेचे अध्यक्ष गुरुचरणसिंग सांगा, मध्य प्रदेशचे हिरालाल ताम्रकर, उत्तर प्रदेशचे अमरपाल सिंग, उत्तराखंडचे भरतसिंग रावत, दिल्लीच्या अनुजा भट्टाचार्य, निवृत्त न्यायाधीश वसंत पाटील, कमलाबाई शुक्ला, ‌सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ संज्योत पालीवाल, उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्कर नायगावकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव माने, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष विष्णुपंत धाबेकर, मेळाव्याचे मुख्य संयोजक बुबासाहेब जाधव, अण्णासाहेब जाधव आदीसह मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना पालीवाल म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतात आलेल्या गोऱ्या इंग्रजा बरोबर संघर्ष केला. त्यांनी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळविले. मात्र या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या हक्कासाठी हा दुसरा संघर्ष सुरु केला आहे. हरियाणा, पंजाब व इतर उच्च न्यायालयाचे निकाल स्वातंत्र्य सैनिकांच्या बाजूने लागलेले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी त्याचे उल्लंघन करीत आहे. विशेष म्हणजे लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वातंत्र्य सैनिकांच्या बाजूने निश्चित लागणार असल्याचा  आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी वसंतराव नागदे, नांदेडचे मारुतीराव क्षीरसागर, माधव देशमुख, संजय शिंदे, वसंतराव देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले. तर प्रास्ताविकात मुख्य संयोजक बुबासाहेब जाधव यांनी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांना येणार्‍या विविध अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याची माहिती दिली. ते प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांच्या संघटनांनी अशा पद्धतीचे देश पातळीवरील मेळावे घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वागताध्यक्ष विष्णुपंत धाबेकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारस पत्नी व पाल्यांसाठी संसदेने १९७२ साली तरतूद केलेल्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. स्वातंत्र्यसैनिकांना रेल्वे पास, ओळख पत्र व शासकीय कार्यालयात त्यांचा अवमान होणार नाही अशी वागणूक देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर मेळावास्थळी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभाई पटेल व रामभाऊ जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.  सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा गौरीशंकर जाधव यांनी मानले. दरम्यान, स्वातंत्र्य सैनिक कन्या शीला उंबरे यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा संग्राम या विषयी काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् व राष्ट्र गीताने करण्यात आली. या मेळाव्यास देशाच्या विविध प्रांतातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी आबासाहेब जाधव, पोपट जाधव, संपत जाधव, अनिल जाधव, सतीश जाधव,‌ सौदागर जगताप यांच्यासह चिलवडी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. 
Top