जिल्हा विधीज्ञ मंडळाकडून बार कौन्सिलचे नूतन अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. साळुंखे यांचा सत्कार

 उस्मानाबाद-इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील वकिलांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. गोवा सरकारने लिगल जस्टीस अकॅडमीसाठी 50 एकर जागा दिली, अरविंद केजरीवाल यांनी वकिलांसाठीच्या योजनांसाठी प्रतिवर्षी 65 कोटी दिले, परंतु महाराष्ट्र सरकारने ज्युनिअर वकिलांना प्रतिमाह तीन हजार रूपये स्टायपंंड देण्याचा निर्णय 2015 साली घेतला. परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही, ही वस्तुस्थिती. वकिलांचे एक ना अनेक प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष झाले असल्याची खंत बार कौन्सिल अ‍ॅन्ड गोवाचे नूतन अध्यक्ष तथा उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. डी. साळुंखे यांनी व्यक्त केली.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या नूतन अध्यक्षपदी मराठवाड्याचे सुपूत्र अ‍ॅड. व्ही. डी. साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने गुरूवारी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले हे होते. तर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे सदस्य अ‍ॅड. मिलींद पाटील, अ‍ॅड. राम गरड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य अ‍ॅड. सस्ते  यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अ‍ॅड. साळुंखे म्हणाले की, मराठवाड्यात बहुतांश न्यायालयांच्या इमारती निजामकालीन आहेत. न्यायालयीन कामकाजासह वकिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. वकिलांसाठी विशेष कायदेविषयक कार्यक्रम होत नाहीत, वकिलांसाठी कुठल्याही शासकीय योजना नाहीत. परंतु अशाही स्थितीत अ‍ॅडव्होकेट वेल्फेअर फंडातून गरजू वकिलांना कोरोना काळात उपचारासाठी तसेच मयत वकिलांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे. 850 वकिलांना बार कौन्सिलने उपचार आणि निधनानंतर वारसांना मदत म्हणून तीन कोटी 12 लाखांचा मदत निधी चारशेहून स्थानिक विधीज्ञ मंडळांमार्फत वितरीत केले आहेत. केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारने वकिल आणि न्यायव्यवस्थेतील गैरसोयी दूर करण्यासाठी लागणार्‍या आवश्यक सुविधांसाठी योजना राबविल्या. मात्र राज्य सरकारला 2015 पासून आजपर्यंत ज्युनिअर वकिलांसाठी तीन हजारांच्या स्टायफंडसाठी आर्थिक तरतूद करता आली नाही. तसेच वकिल संरक्षण कायद्याचा मसुदाही सरकारकडे सादर केलेला आहे. त्याचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे आहे. परंतु त्याकडेही दुर्लक्ष झाल्याची खंत साळुंखे यांनी व्यक्त केली.

दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या विचार विभागाच्या समन्वयकपदी अ‍ॅड. राज कुलकर्णी यांची तर अ‍ॅड. योगेश अबुज यांची तुळजाभवानी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. नितीन भोसले यांनी केले. भोसले यांनी बार आणि बेंचमधील असमन्वय, त्यामुळे होणारे परिणाम, वकिलांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी बार कौन्सिलने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी मनोगत व्यक्त करत अ‍ॅड. साळुंखे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. तानाजी चौधरी यांनी केले. कार्यक्रमास विधीज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व अन्य विधीज्ञ बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top