उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी खासदारांचा काम न करता फक्त दिखावाच या नितीन काळे यांच्या वक्तव्याचा खरपुस समाचार सतिश सोमाणी यांनी घेतला आहे. मालकाने सांगितले म्हणुन लगेच घरगडी होवू नका असा टोला या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना सतिश सोमाणी यांनी लगावला आहे.

दुसऱ्यांनी मार्गी लावलेल्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करुन स्वत:ला सिंह समजणाऱ्या व त्यांच्या सोबत राहून कोल्हेकूई करणाऱ्या लबाड कोल्ह्यांनी एकदा आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख  सतिश सोमाणी यांनी म्हटले आहे. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामासाठी सातत्याने आढावा बैठका घेवून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असून या रेल्वे मार्गाचे श्रेय आपल्या मालकास मिळत नसल्याने घरगड्याचा पोटसुळ उठून संभाव्य वक्तव्य अज्ञानापोटी केले आहे. रेल्वेचा विषय हा केंद्र सरकारच्या अधिन असणारा विषय आहे. आजपर्यंत 1 हजार कोटी रु. प्रकल्प किंमत असणाऱ्या प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये 32 कोटी रु. अल्प तरतूद केली आहे. त्याला जबाबदार कोण याचे उत्तर द्या केंद्रामध्ये भाजपाचे सरकार असून रेल्वेचे राज्यमंत्री हे मराठवाड्यातीलच भाजपाचे नेते आहेत. ही गोष्ट भाजपातील नेत्यांना माहित असूनही स्वत: केंद्राकडे या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा न करता राज्य सरकारकडे बोट दाखवून आपल्या नाकरतेपणावर पांघरुन घातले आहे. रेल्वे हा केंद्राचा विषय असून केंद्राकडून 500 कोटी रुपयांची तरतुद अपेक्षित असताना राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य शासन राज्याचा हिस्सा मागणे हे आपले ठेवायचे झाकून या लोकभाषेतील म्हणीप्रमाणेच भाजपातील नेत्यांचे वागणे आहे.

नितीन काळे यांनी बोलघेवडेपणा कमी करुन रेल्वे प्रकल्प पुर्ण होण्यासाठी मालकासह स्वत: आपले वजन केंद्रात वापरावे व प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न हे केंद्रसरकारकडेच जमा होणार असून राज्य शासनाकडे बोट दाखवणे बंद करावे अशी प्रतिक्रीया शिवसेना तालुका प्रमुख श्री. सतिश सोमाणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


 
Top