एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करुन कामगारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने घेतलेल्या भूमिकेचे एसटी कामगारांनी स्वागत करुन जाहीर पाठिंबा दिला. उमरगा आगारात दुखवटा आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कामगारांची आपचे जिल्हाध्यक्ष अॅड. अजित खोत यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कामगारांनी विलीनीकरणाबाबत सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. खोत यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन एसटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. खोत यांनी उमरगा येथे आंदोलनात सहभागी असलेल्या एसटी कामगारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. एसटी कामगारांनी सांगितले की, शासन एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत उदासीन आहे. त्यामुळे न्यायालयातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो. त्यासाठी आम आदमी पार्टीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कामगारांनी केली.
यावेळी आम आदमी पार्टीच्या उमरगा तालुकाध्यक्षपदी राहुल डोणगावे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अॅड.अजित खोत व जिल्हा सचिव मुन्ना शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, एसटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.