उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद येथील बहुप्रतिक्षित वैद्यकीय महाविद्यालय आगामी शैक्षणिक वर्षात सुरू व्हावे, ही  सबंध जिल्हावासियांची इच्छा आहे. या अनुषंगाने आज वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, पालकमंत्री ना. शंकराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशासकीय इमारत, चिकित्सालय विभाग, अधिकारी कर्मचारी निवासस्थाने, विद्यार्थी वसतिगृह, यासाठी किमान २० एकर जागेची आवश्यकता असून सर्व बाबींचा विचार करता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा योग्य असल्याचे ठाम मत आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी व्यक्त केले. आजवर महाविद्यालयासाठी जागा निश्चित झाली नसल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले. यापूर्वी निर्धारित केलेल्या जागेवर दगडाची खाण आहे. सदरील जागा अतिशय ओबड-धोबड असून कुठल्याच प्रकारे ही जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी योग्य नसून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आजच्या बैठकीमध्ये केली.

 ना.अमित देशमुख यांच्यासह पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी देखील यास सहमती दर्शवली असून जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला गरजेनुसार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील जागा उपलब्ध करून देण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली, उपस्थित असलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री देखील यास राजी झाले.

 महाविद्यालयासाठी नवीन अधिष्ठाता डॅा. राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा ८ वर्षे सेवा कालावधी बाकी आहे. पूर्वीचे अधिष्ठाता नियत वयोमानानुसार निवृत्तीला आले होते व त्यांच्याकडे काहीच अधिकारी नसल्याने प्रस्तावित महाविद्यालयाचे काम ठप्प होते. नवीन अधिष्ठाता यांच्या नियुक्तीमुळे निश्चितच महाविद्यालयाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास आ. श्री. राणाजगजितसिंह पाटील   यांनी व्यक्त केला.

 पदभरतीची जाहिरात आणखीन दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत कधीपर्यंत काय करणार याचा कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातून तरतूद करण्याबाबत देखील चर्चा झाली असून पालकमंत्री ना. शंकराव गडाख यांनी त्यास सहमती दर्शविली आहे.

 पद भरती, जागा निश्चिती व हस्तांतरण तसेच प्रयोगशाळा उभारणे याबाबत आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनांचा अनुषंगाने पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे या कामांना अधिकची गती मिळेल व उस्मानाबाद करांचे अनेक वर्षांपासूनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आगामी शैक्षणिक वर्षांत पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 
Top