उस्मानाबाद / प्रतिनिधी

भूम तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदाराला स्वस्त धान्य दुकानदाराकडून पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई सोमवारी दि. 7 मार्च रोजी भूम येथे केली. या प्रकरणी पोलीसांनी नायब तहसीलदार पंडीत राठोड यांना अटक केली आहे.

पोलीसांनी सांगितले की, रामेश्वर ता. भूम येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री. जाधव यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी नायब तहसीलदार पंडित रामराव राठोड यांनी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते. दुकानदार श्री. जाधव यांनी पैसे देतो म्हणत दुकान तपासणी अहवाल भरून घेतला होता. परंतु पंडित राठोड यांनी वारंवार लाचेची मागणी करतच राहिल्याने श्री. जाधव हे संतप्त झाल्याने व लाच देण्याची इच्छा नसल्याने अखेर अशा अधिकार्‍यांना धडा शिकवण्यासाठी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार दिली. सोमवारी (दि.7) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारच्या सुमारास सापळा रचून नायब तहसीलदार पंडित राठोड यांना पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार रेशन दुकानदार श्री. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, रास्त भाव दुकानांमध्ये अधिक मिळगत नसताना मात्र अधिकार्‍यांकडून पैशाची मागणी अधिकच होत असल्याने टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक प्रशांत संपते, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, विशाल डोके यांच्या टीमने केली. मागील जुलै महिन्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यावर कारवाई केली होती. त्यातच जिल्हाधिकारी यांनी भूम महसूल विभागाकडे लक्ष केंद्रित केले असतानासुद्धा पुन्हा महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्याने लोकांमध्ये वेगळी चर्चा केली जात आहे.

 
Top