उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राजमाता जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान रस्त्याचे काम सुरु होणार आहे. लवकरच कामाला शुभारंभ होणार आहे. नगर पालिकेच्या या तत्परतेने आंदोलनकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांचा वनवास संपुष्टात येणार आहे.

राजमाता जिजाऊ चौकापासून बोंबले हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करून नगरपालिकेकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच मोर्चाही काढला होता. उस्मानाबाद नगरपालिकेने या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. डी.सी.अजमेरा या ठेकेदाराला निविदा प्रक्रियेतील अटी आणि पूर्ततेच्या अधीन राहून या रस्त्याचे काम दिलेले आहे.

राजमाता जिजाऊ चौकापासून तेरणा पब्लिक स्कूल पर्यंत आणि नितीन आदमिले यांचे घर पासून लाटे यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता तयार केला जाणार आहे. यासंबंधीचे आदेश (जावक क्रमांक  ११७९ /७ मार्च २०२२) नगरपालिकेने ठेकेदारास काढलेली आहेत. लवकरच रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून सुरुवात केली जाणार असल्याचे नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली रस्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. ठेकेदाराच्या काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित केला जाणार आहे, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण येलगट्टे यांनी सांगितले.

 
Top