उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बुधवारी केली.

काळेे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. ते आता उघड झाले आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेचा विरोधकांना संपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात येत आहे. या प्रकारात पोलीस गुंतले असल्याने याची चौकशी सीबीआयकडूनच करायला हवी. राज्यात लोकशाही संकटात असून अराजक निर्माण होत आहे. भारतीय जनता पार्टी या विरोधात संघर्ष करेल, असे काळे म्हणाले. 

 
Top