उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात वाढलेल्या हरभर्‍याचे उत्पन्न पाहता शासकीय हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदीची मर्यादा वाढवावी अशी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केलेली मागणी व जिल्ह्यातील 2247 शेतकर्‍यांवर भूविकास बँकेचे कर्ज असल्यामुळे तीन पिढ्यांपासून त्यांना कर्ज मिळत नव्हते, याबाबत वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मागणी केली होती. या दोन्ही मागण्यांला यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून दुधगावकर यांचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यात हरभरा पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र मार्केटींग फेडरेशनच्या वतीने हरभरा खरेदी केंद्रावर केवळ साडेसहा क्विंटलची मर्यादा ठेवली होती. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे शुक्रवारी (दि.4) जिल्ह्यात यावर्षी हेक्टरी 15 क्विंटलच्या पुढे उतारा पडत आहे. त्यामुळे राहिलेले 9 क्विंटल कुठे घालायचे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने प्रति हेक्टरी 15 क्किंटल खरेदी करण्याची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीला काहीअंशी म्हणजे साडेनऊ क्विंटल खरेदीची मर्यादा वाढवली आहे. तसेच जिल्ह्यातील 2247 शेतकर्‍यांचे भूविकास बँकेकडील सन 1980 सालापासून विहीर, पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटार, हलयंत्र, कुक्कट पालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन आदी शेतीपर्वुक शेतकरी व्यवसायाचे 64 कोटी 43 लाख कर्ज वाटले होते. हे सर्व कर्ज माफ व्हावे, या मागणीसह नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबई येथे 23 सप्टेंबर 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.11) केलेल्या अर्थसंकल्पात या दोन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


 
Top