उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हरभरा पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातच मार्केटींग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात 18 हरभरा खरेदी केंद्र सुरु केली आहेत. मात्र हरभरा खरेदी केंद्रावर केवळ साडेसहा क्विंटलची मर्यादा ठेवली आहे. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे हेक्टरी 15 क्किंटल उत्पन्न निघत असून राहिलेला हरभरा घालण्याची शेतकर्‍यांना अडचण येत आहे. त्यामुळे ही जाचक अट व ऑनलाईन खरेदीची जाचक अट रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे शुक्रवारी (दि.4) केली आहे.

जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रावर आजपर्यत केवळ 1366 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.मात्र अनेक शेतकर्‍यांना ऑनलाईन नोंदणी करता येणे शक्य होत नाही. त्यातच कृषी विभागाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ साडेसहा क्विंटल हरभरा खरेदी करण्याची अट घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेजारील जिल्ह्यात साडेनऊ क्विंटल हरभरा खरेदी केला जात आहे. असे असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यावर एकप्रकारे अन्याय केला आहे. जिल्ह्यात यावर्षी हेक्टरी 15 क्विंटलच्या पुढे उतारा पडत आहे. त्यामुळे राहिलेले 9 क्विंटल कुठे घालायचे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. या जाचक अटीमुळे खाजगी बाजारपेठेत हरभर्‍याचे भाव गडगडणार आहेत. याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. हे टाळण्यासाठी शासनाने प्रति हेक्टरी 15 क्किंटल खरेदी करण्याची मर्यादा वाढवावी, अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.


 
Top