उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले उसाच्या फडाकडे कारखाने गाळप करण्यासाठी करीत असलेले दुर्लक्ष यामुळे ऊस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच उभ्या असलेल्या सलग १० एकर उसाच्या फडाला भर दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शेतातील विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत उसाच्या फडाची जळून जाग्यावरच राख झाली.  तर उसाच्या फडा लगतच असलेल्या  भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद अंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे २ बंब व कळंब येथील अग्निशमन गाडी जवानांसह घटनास्थळी तात्काळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी अग्निशमन गाडी व्यतिरिक्त इतर खासगी ४ टँकरद्वारे पाणी मागवून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्टा केली हे विशेष. या आगीमध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद शहरातील सांजा रोड बायपास मार्गावरील औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या श्रीकांत महाजन यांच्या गट नं.३४८ या शेतातील १० एकर क्षेत्रावर उसाची लागवड केलेली आहे. ऊस पूर्णपणे तोडणीस आला आहे. दि.१८ मार्च रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शेतात असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या उसाच्या फडास आग लागली. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा पारा देखील वाढू लागला आहे. वातावरणातील उष्णता देखील या आगीचा पोषक ठरल्यामुळे ही आग झपाट्याने सर्वत्र पसरुन तिने काही क्षणातच आपले उग्ररूप धारण करुन संपूर्ण उसाच्या फडाचे क्षेत्र आपल्या कवेत लेपेटून घेतले. तर या फळा लगत असलेल्या फय्युम शेख यांचे भंगाराचे दुकान देखील आगीत जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच उस्मानाबाद येथील अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी तात्काळ अग्निशमनचे २ बंब घेऊन शर्तीचे प्रयत्न केले. तर त्यांच्या मदतीला कळंब येथील अग्निशमन विभागाचे जवान वाहनांसह धावून आले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.


 
Top