उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना कदापि डावलले जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात. त्यामुळे सर्व महिला पदाधिकार्‍यांनी पूर्वीप्रमाणेच एकजुटीने पक्षाचे काम करावे. ‘त्या’ नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्याची माहिती उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकार्‍यांनी दिली.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देणार असल्याचे जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकार्‍यांनी दि. 16 मार्च रोजी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. निष्ठावंतांना पक्षात स्थान राहिले नसल्याची खंतही यावेळी महिला पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर महिला पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे आज (दि.19) सकाळी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना खासदार पवार यांनी महिला पदाधिकार्‍यांनी पूर्ववत पक्षात कार्यरत रहावे असे सांगून निष्ठावंतांना कदापि डाववले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती अ‍ॅड.मंजुषा मगर व सुरेखा जाधव यांनी दिली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

 खा. शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आम्ही यापुढे मा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने काम करणार असल्याचे अ‍ॅड.मंजुषा मगर-माडजे व सौ.सुरेखा जाधव यांनी सांगितले. शिष्टमंडळात सौ.वंदना डोके, सौ.सलमा सौदागर, सौ.अमृता दुधाळ, सौ.प्रीती गायकवाड, सौ.स्वाती भातलवंडे, कु.ऋतुजा भिसे, सौ.अफसारा पठाण, सौ.ज्योती माळाळे, सौ.सुनंदा भोसले, सौ.मनीषा साळुंके, सौ.बालाश्री पवार,सौ. शोभा मस्के यांचा समावेश होता.


 
Top