उमरगा/ प्रतिनिधी-

नगर पालिकेकडून गेल्या १५ वर्षांपासून पशूप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत होते, मात्र कोरोनामुळे यंदा पालिकेने या प्रदर्शनात सहभाग घेतला नाही. बिरुदेव देवस्थान पंचकमेटीने कोरोना नियमावलीचे पालन करत सलग दुसऱ्या वर्षी भरविलेल्या पशू प्रदर्शनात जवळपास सात हजार विविध जातींची जनावरांची खरेदी- विक्री झाली असून प्रदर्शनाचा शुक्रवारी (दि ११) समारोप झाला आहे.

उमरगा-लातूर मार्गावरील श्री बिरुदेव मंदिराच्या परिसरात २६ जानेवारीपासून पशू प्रदर्शन सुरू झाले आहे. कर्नाटक राज्यासह निलंगा, औसा, देवणी, सोलापूर, विजापूर आदी भागातील विविध जातींची देखणी आणि आकर्षक जनावरे प्रदर्शनात दाखल झाली होती. पंधरा दिवसांत जनावरांच्या खरेदी-विक्रीतून चारशे दाखले देण्यात आल्याने जवळपास अडीच कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल झाली. पावणेदोन लाखांची बैलजोडी सांभाळणारे अनेक शेतकरी आहेत. पशू प्रदर्शनात दोन दाती ते सहा दाती खिल्लार, लाल कंधारी, देवणी आदीसह ज्वार जातीची बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. उत्कृष्ट बैलजोड्यांची किंमत ७० हजार ते दीड लाख रुपयापर्यंत खरेदी झाली. साधारण बैलजोडी पन्नास ते ६० हजार रुपयांपर्यंत होती. दीड लाख किमतीच्या बैलजोड्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या. शेतकरी विक्रम लिंबाळे यांनी येणेगुर येथील व्यापारी माणिक मुल्ला यांच्याकडून पावणे दोन लाखाची खिल्लार बैलजोडी खरेदी केली. दुभत्या पशु सोबत संकरित व ज्वारी गायी, म्हैस, भुरा म्हैस आदींच्या किमतीही सत्तर हजारापर्यंत आहेत. या पशू प्रदर्शनासाठी माजी नगरसेवक मधुकर घोडके, बालाजी घोडके, व्यंकट घाटे, आदम माडजकर, परमेश्वर दळगडे आदींनी पुढाकार घेतला होता. 

 
Top