उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांंतर्गत उस्मानाबाद नगरपालिकेमार्फत आठवडी बाजार परिसरात बेघर व्यक्तींच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या निवारा वास्तूचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

शहरातील बेघर नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी बांधण्यात येणारी निवारा वास्तू अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असेल, अशी माहिती खासदार राजेनिंबाळकर यांनी दिली.

तसेच निवारा वास्तूत एक मोठा हॉल, दोन खोल्या व महिला अन् पुरुषांसाठी वेगवेगळे टॉयलेट असणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यलगट्टे यांनी सांगितली. याप्रसंगी शहरप्रमुख संजय मुंडे, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, वैशाली आवाड, दिनेश बंडगर आदींसह नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 
Top