उस्मानाबाद / प्रतिनिधी-

समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली व अधिकच्या उसामुळे गाळप वेळेत होत नसल्याने अनेक ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. पिकविलेला ऊस कारखान्यांनी न्यावा यासाठी कारखान्याकडे खेटे घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेउन त्या मार्गी लावण्याबाबत व ऊस तोडणी प्रोग्राम राबविण्याबाबतची कार्यपद्धती ठरविण्याच्या अनुषंगाने  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

   जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यातील लागवडीचा ऊस अजूनही शिल्लक आहे,  कारखाना ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र सोडून बाहेरून ऊस मोठ्या प्रमाणात आणला जातो,  लेबर मार्फत तोड सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मागितले जातात, याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार पडतो, लागण नोंदी प्रमाणे ऊस न तोडला जात नाही

  उपरोक्त मुद्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विभागीय सह संचालक (RJD) यांच्यासोबत चर्चा झाली. प्रत्येक गावात शिल्लक असलेल्या उसाची माहिती कृषी खात्यामार्फत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांना दिल्या. त्यानुसार प्रत्येक गावात लागवड नोंदी प्रमाणे  महिनावार किती ऊस शिल्लक आहे याची माहिती येत्या ४ दिवसात ते उपलब्ध करून देणार आहेत. या माहितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारखान्यांसाठी योग्य ते आदेश निर्गमित करून या आदेशाच्या अनुपालनासाठी यंत्रणा सुनियोजित करून ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविण्याबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले.


 
Top