उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील मस्सा (खं), हसेगाव (के), व येरमाळा येथील शेतकर्‍यांच्या शेतातील उत्खनन केलेले नसताना शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर 40 कोटीपेक्षा जास्त उत्खनन दंड म्हणून केलेल्या बोजाची नोंद त्वरीत रद्द करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तसंजय पाटील दुधगावकर यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे बुधवारी (दि.26) केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, खामगांव-पंढरपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गामुळे अनेकांचा प्रवास सुखकर होणार आहे. सदर काम मेघा इंजिनिअरींग कंपनी करत आहे. कंपनीने तालुक्यातील मस्सा (खं), हसेगांव (के) व येरमाळा येथील काही सर्व्हे नंबर मधून गौन खनिज उत्खनन केलेले आहे. याप्रकरणी तत्कालीन तहसिलदार यांनी मेघा इंजिनिअरींग कंपनीने मंजुरीपेक्षा अधिक उत्खनन केल्याप्रकरणी कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र संबधित कंपनीने प्रतिसाद न दिल्यामुळे व त्यांच्यामध्ये अर्थपुर्ण सेटलमेंट झाल्यामुळे महसूल प्रशासनाने उत्खनन मस्सा (खं), हसेगाव (के) व येरमाळा येथील शेतकर्‍यांच्या सर्वे नंबरवर कसलीही खातरजमा न करता 40 कोटीच्यावर बोजाची नोंद केली आहे. सदर नोंदवलेला बोजा बेकायदेशीर असून संबधित शेताची स्थळ पाहणी करुन या तीनही गावातील शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील बेकायदेशीर बोजा रद्द करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने संबंधिताविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

 
Top