उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन करणाऱ्या 11 पूजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या पूजाऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर प्रवेश बंदीच्या कारवाईचा दणका दिला आहे. गाभाऱ्यात प्रवेश बंदी असताना अनधिकृत प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे,बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसविणे या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक पूजाऱ्यावर कारवाई केल्याने पूजाऱ्यात खळबळ उडाली आहे तर अन्य इतर पूजाऱ्यांनाही नोटीसा दिल्या आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानने तक्रार दाखल करण्यासाठी व्हाट्स अँप सुविधा सुरु केली होती त्यात आलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेज यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 11 पुजारी यांच्या विरोधात एक महिना ते तीन महिना मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. स्वप्नील भोसले व ओंकार खुंटाफळे यांच्यावर देऊळ कवायतच्या कलम 36 नुसार कारवाई करण्यात आली आहे तसेच आपणास सहा महिने मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये अशी नोटीस दिली आहे.

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास निजाम काळापासून प्रवेश बंदी आहे या नियमाचे पालन कडकपणे सुरु आहे. संकेत अनिल शिंदे, ओंकार लक्ष्मीकांत भिसे, वेदकुमार पेंदे, स्वप्नील दत्ता भोसले, ओंकार राजेश खुंटाफळे, विवेक चिमाजी साळुंके या 6 जणांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली आहे तर अक्षय कदम,अनिकेत शिंदे, संकेत किरण पाटील, अभिषेक राजकुमार पाटील व पंकज भाऊसाहेब कदम या 5 जणांना एक महिना मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. 

काही तक्रारी असल्यास 9420962233 या व्हाट्स अँप क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. काही मोजक्या पुजारी यांच्या गैरवर्तवणुकीमुळे सर्वच पुजारी यांना बदनाम करणे योग्य नाही, काही सुरक्षा रक्षक व कर्मचारी गैरवर्तवणूक करतात त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी केली.

 
Top