उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चालू रब्बी हंगामात तेरणा धरणातून कॅनालद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा,यासाठी कॅनाल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेमध्ये याअनुषंगाने प्रश्न उपस्थित केला.कालवा दुरुस्तीची कामे कधी सुरु करण्यात येतील व कधी पर्यंत पूर्ण होतील याची विचारणा करण्यात आली.

आमदार पाटील म्हणाले की, ही कामे पूर्वीच सुरु झाली असती तर पूर्ण रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळाले असते. तेरणा बंद पाईप लाईनमधील तांत्रिक दोष शोधून ती पुन: कार्यान्वित करण्यासाठी वेळ लागणार आहे. कालव्याची दुरुस्ती झाल्यास तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी, भंडारवाडी या गावातील जवळपास १६५५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकते. तेरणा धरणामध्ये पर्याप्त पाणीसाठा असून अस्तित्वातील कालव्यांची दुरुस्ती केल्यास या रब्बी हंगामामध्ये किमान एक तरी आवर्तन देणे शक्य आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नाला उत्तर देताना प्रकल्पावरील अस्तित्वातील कालव्याची आवश्यक दुरुस्ती कामे करून कालव्याद्वारे सिंचन व्यवस्थापन यंत्रणेद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

विधानसभेमध्ये उत्तर देताना जलसंपदामंत्री पाटील म्हणाले की, उस्मानाबादला गेल्यावर माझी याबाबत बैठक झालेली होती आणि सध्या आपण तिथे कालव्याचे काम चालू करत आहोत. कालवा जुना होता त्यानंतर बंद पाईपचे काम आपण केले, त्यात काही दोष निर्माण झाले म्हणून कालवा पूर्ण क्षमतेने वाहून सिंचन वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.त्याप्रमाणे कालव्याच्या दुरुस्तीची कामे होतील असे सांगितले.

 
Top