उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतकऱ्यांची वीज बिलाची होत असलेले सक्तीने वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी आज दिनांक ३ डिसेंबर रोजी मनसेने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.

 उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. राज्य शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत  मोर्चा थेट महावितरण कार्यालयावर धडकला. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची वीज तोडणीसाठी पोल वर चढलेला असेल तर त्या कर्मचाऱ्याला सर्व शेतकऱ्यांच्या पंपाची वीज जोडणी पर्यंत खाली उतरू दिले जाणार नाही. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी दिला आहे.

 महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यभर महावितरणकडून शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे  वीज बिल थकीत आहे. त्या शेतकऱ्यांची विद्युत रोहित्र पासून वीज पुरवठा खंडित करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी शासनाकडून साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बिल वसूल करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असताना ऊस लागवडीच्या व रब्बी पेरणीच्या कामात व्यस्त असताना अशा प्रकारे वीज बिल वसुली म्हणजे ठाकरे सरकारच्या जुलमी राजवटीचा कळस आहे. राज्य शासनाकडून विज बिल माफ होईल अशी अपेक्षा असताना बेकायदेशीर वसुली सुरू केली आहे.  ही बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबविण्यात यावी ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित केली आहे ती पूर्ववत सुरू करावी अन्यथा आपल्या कार्यालयात विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिलेल्या निवेदनातून केला आहे.

   या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तालुकाध्यक्ष पाशा शेख, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण,शिवानंद ढोरमारे विक्रम गपाट,रविराज घाडगे,बाळासाहेब भुईगळ, गोरख भोसले, अविनाश जंगले,वैभव ढवळे,करण परीट,बबलू जंगाले यांच्या सह्या आहेत या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेतकरी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील होते. या मोर्चाने उस्मानाबाद शहरांमध्ये काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलिस प्रशासनाच्या वतीने आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

 
Top