उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या दोन चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेल्या १४ पैकी पाच मोबाइल उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे.

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजय श्रावण शिंदे व सुनील श्रावण शिंदे उर्फ काळ्या यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील चार गुन्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील एक गुन्हा अशा पाच गुन्ह्यांतील चोरीचे सोन्याचे दागिने व चोरीच्या दुचाकींसह १४ मोबाइल मिळाले होते. त्या भ्रमणध्वनी विषयी ते दोघे पोलीसांना समाधानकारक माहिती देऊ शकले नव्हते.

त्या १४ मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकाचे सायबर पोलिस ठाण्यात तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते. त्यामधील पाच मोबाइल उस्मानाबाद शहर, बेंबळी, ढोकी, येरमाळा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांची टोळी जेरबंद करुन जरब बसवली आहे.


 
Top