उस्मानाबाद


(प्रतिनिधी) - दिव्यांगाना विकासाच्या प्रवाहात आणणे हे सर्वांचे कर्तव्यच नाहीतर ती सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा व गरजांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी दि.३ डिसेंबर रोजी केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक, रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद समाज कल्याणचे सभापती दिग्विजय शिंदे तर पाहुणे म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता सांळुके, पोलिस उपअधीक्षक अंजुम शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भारत कांबळे व  सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, सुर्योदय अंपग विकास मंडळचे प्रदिप डोके,  प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, परिवर्तन रसूल सय्यद, नागेश धामशेटटी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कांबळे म्हणाल्या की, दिव्यांग हा समाजाचा अतूट घटक असून सर्वांनी त्यांच्या व्यंगाकडे न पाहता माणूस म्हणून त्यांना आपुलकीची वागणूक देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने खास दिव्यांगासाठी एकूण विकास निधीच्या ३ तीन टक्के निधी त्यांच्या विकासासाठी राखून ठेवलेला आहे. हा निधी केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत असल्यामुळे तो निधी इतर कोणत्याही विकास कामासाठी न वापरता किंवा न वळविता तो केवळ दिव्यांगांच्या विकासासाठीच वापरावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध वस्तूचे स्टॉल, एस.टी महामंडळ, दिव्यांग वित्त महामंडळ, जि. प. समाज कल्याण, तहसील कार्यालय आदीचे स्टॉलचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दिव्यांग शाळेतील कर्मचारी, दिव्यांग बांधव समाज कल्याण विभागातील कर्मचारी यांनी  रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्या शिबिराचे उद्घाटनही  कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी दिव्यांग व्यक्तींना ऑनलॉईन घरकुल, वैश्विक ओळखपत्र (युआयडी कार्ड), दिव्यांगांना व्हीलचर, तीन चाकी सायकल, कुबडया, श्रवण यंत्र, मतिमंदासाठी किट आदी साहित्य वाटप करण्यात आले. 

 तर दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृह यांच्या घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सोजर मतिमंद शाळा कळंब, स्वअधार मतिमंद मुलींचे बालगृह उस्मानाबाद, अस्थिव्यंग कै. उध्दवराव पाटील अस्थिव्यंग शाळा उस्मानाबाद, कार्यशाळा, श्री. शांतेश्वर अपंग प्रशिक्षण केंद्र सास्तूर, सोजर मतिमंद शाळा भूम यांचा समावेश आहे. तर दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या संस्था, कर्मचारी, व दिव्यांग संघटना, शाळा यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी एकुरगावाडी येथील स्वअधार बालगृह व सास्तूर शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आभार भारत कांबळे यांनी मानले.

 
Top