एकांकिका स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे


उस्मानाबाद /प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, उस्मानाबाद व एस.पी. शुगर्स ऍण्ड ऍग्रो प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथे गंगाधर करंडक-२०२१ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व एस.पी. शुगर ऍण्ड ऍग्रो प्रा. लि.चे चेअरमन सुरेश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.११ डिसेंबर रोजी केले.

उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अ.भा.म. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, माधव गरड, गणेश शिंदे, डॉ अरविंद हंगरगेकर, प्रा. शिवाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुरेश पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.७, ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश असून नाट्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा ही नाट्य स्पर्धेची भूमी असून त्याची सुरुवात सातवाहन व बौद्ध कालखंडात झाली आहे. कलावंतांची ही नाट्य चळवळ सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी, त्या कलाकारांमधील कलेला व कलाकारांना  अधिक गती प्राप्त व्हावी हा उद्देश या पाठीमागील आहे. त्यासाठी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास ७१ हजार रुपये तर द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये, तर चौथ्या क्रमांकाचे २५ हजार रुपये तसेच पाचव्या क्रमांकासाठी १५ हजार रुपये याबरोबरच वैयक्तिक रोख रकमेची बक्षिसे ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  महाराष्ट्रात सर्वात मोठा हा कार्यक्रम उस्मानाबाद येथे होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा सिने अभिनेते मोहन जोशी, सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या नाट्य क्षेत्रासाठी आपले बहुमूल्य योगदान दिले असून त्या कलावंताचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्यासाठी त्यांना देखील वाव देण्याचे काम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा अतिशय दर्जेदार कार्यक्रम होणार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तर अधिक माहितीसाठी मो.नं.- ८८८८३३३८९५ व ९८६०४४५१४३ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन विशाल शिंगाडे व सुरेश पाटील यांनी केले आहे.

 
Top