उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद – कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षामधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये स्वागत केले.  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व युवासेना प्रमुख तथा राज्याचे राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री डॉ. प्रा. आ. तानाजीराव सावंत , जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री  शंकररावजी गडाख-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार मा. ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांनी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांना भावी सामाजिक व राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. 

नागरिकांच्या समस्या जाणून घेत, सर्वांना बरोबर घेऊन लोककल्याणाची कामे अधिक सक्षमपणे करावीत व पक्ष अधिक मजबुत करावा, अशी अपेक्षा आ. कैलास पाटील यांनी व्यक्त केली.

कळंब तालुक्यात मंगरुळ हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे गाव मानले जाते. याच गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मंगरुळच्या सरपंच केवळबाई नारायण शिंदे, उपसरपंच सुधाकर मल्हारी पानढवळे, ग्रामपंचायत सदस्य संदीपन झाडके, प्रशांत कांबळे, हणमंत रितापुरे, प्रियंका भराडे यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. या ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांसमवेत बाळासाहेब काळे, नवनाथ भराडे, किरण काळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात या सर्वांचे आमदार घाडगे- पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये स्वागत केले. 

मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार घाडगे- पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघाचा व आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आमदार घाडगे – पाटील यांचे सहकार्य लाभत असल्याने  त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.

 
Top