उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस्मानाबाद जिल्ह्यात कृषीच्या पथदर्शक प्रकल्पासह ड्रोन वापराचे प्रशिक्षण व सेंटर ऑफ एक्सलन्स च्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान या त्रिसूत्रीची अंमलबजावणी जानेवारी, २०२२ पासून करण्याचा निर्णय ‘सेन्स एकर, हैद्राबाद’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद कुमार व आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबादच्या प्रांगणात ‘सेन्स एकर, हैद्राबाद’ या कंपनीने कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर याचे प्रात्यक्षिक दिले. तद्नंतर झालेल्या चर्चेअंती महाविद्यालयात या तंत्रज्ञानाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सहाय्याने ड्रोन तंत्रज्ञाना विषयी अधिक अभ्यास केला जाणार असून ड्रोनचे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ट्रेनिंग सेंटर’ च्या माध्यमातून कृषी सेवा देण्यासाठी इच्छुक व्यक्तीस ड्रोन वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेती व्यवस्थेस ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे समजण्यासाठी पुढील महिन्यापासून पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

ड्रोनच्या सहाय्याने पिकावरील अगदी सुरुवातीच्या अवस्थेत असलेल्या किडींचा प्रादुर्भाव जो की मानवी डोळ्यांनाही कळायला उशीर लागतो अशी कीड (कोष अवस्थेतील कीटक) अथवा इतर प्रादुर्भाव ‘हाय डेफिनेशन’ कॅमेराच्या सहाय्याने टिपता येतात. जेणेकरून पिकाच्या परिस्थितीचा व त्यावर होणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी योग्य औषधांची योग्य प्रमाणात फवारणी आणि ती ही वेळेवर करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना अत्यंत कमी वेळामध्ये व पैशांमध्ये पिकांची फवारणी करता येणे शक्य होणार असून यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. फवारणी दरम्यान औषध कमी प्रमाणात लागत असून पाण्याचे प्रमाणही कमी लागते. उंचावरून होत असलेल्या फवारणीमुळे ड्रोन द्वारे निर्माण होणारे अत्यंत लहान लहान तुषार पिकांवर सर्वत्र सम प्रमाणात फवारले जातात त्यामुळे पिकावर कीटक नाशक अथवा औषधांचा दुष्परिणाम दिसून येत नाही व रोगावर नियंत्रण राखणे व अधिक उत्पन्न घेणे सोईचे होते असे सेन्स एकर, हैद्राबाद या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद कुमार यांनी सांगितले. 

कीटकनाशके व रासायनिक औषधांच्या फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांना विविध बाधा होत असताना आपण पाहतो. तसेच फवारणीसाठी लागणारा वेळ, पैसा व मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांपुढील अडचण लक्षात घेता भविष्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीची कामे सुलभ व्हावी या करीता तेरणा पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने ‘ड्रोन’ चा पथदर्शक प्रकल्प विद्यार्थ्यांच्या मदतीने उस्मानाबाद परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध केला जाणार आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातील ज्या युवकांना या ड्रोनच्या साहाय्याने कृषी सेवा उद्योगात काम करण्याची इच्छा आहे त्यानी आपले नाव, गाव व संपर्क क्रमांक ८८८८६२७७७७ या व्हाट्सऍप क्रमांकावर पाठवावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब  यांनी केले आहे.

 
Top