तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजाभवानी मंदिरातील टोळ भैरव दरवाजा मागील ११ वर्षांपासून बंद आहे. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी माहिती घेतली असता टोळ भैरव दरवाजा बंद करण्याचे कसलेही आदेश नाहीत. त्यानंतरही हा दरवाजा बंद करण्यात आला आहे. भक्तांसाठी हा दरवाजा उघडण्याची मागणी रोचकरी यांनी पत्रकार परिषदेत केली.

गुरुवारी नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यात त्यांनी भक्तांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. मंदिरातील टोळ भैरव दरवाजा पूर्वी अचानक बंद करण्यात आला होता. पुजारी तसेच नागरिकांनी अनेक वेळा टोळ भैरव दरवाजा उघडण्याची मागणी केली होती. त्यावेळी दिशाभूल करुन दरवाजा उघडण्यात आला नाही. दरम्यान, नगराध्यक्ष रोचकरी यांनी याप्रश्नी पाठपुरावा करत संबंधितास दरवाजा बंद ठेवण्याच्या आदेशाची मागणी केली. त्यावेळी मंदिर संस्थानकडे तसा आदेश नसल्याचे समोर आले. तसेच तुळजापूर पोलिसांनी सुद्धा दरवाजा बंद करण्याचे कसलेही आदेश दिले नसल्याचे सांगितले.


 
Top