उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना महामारीमुळे दीर्घ काळ बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. गेल्या दीड वर्षात अभ्यासावर झालेला परिणाम आणि दहावी बारावीच्या पुढील काळात होणार्‍या परीक्षेला सामोरे जाण्याचा मोठा ताण विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून मनावर कोणतेही दडपण न घेता तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असे प्रेरणादायी आवाहन प्रसिद्ध व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षक व वक्ते अर्शद सय्यद यांनी केले.

उस्मानाबाद शहरात आयोजित व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेत ते बोलत होते. याच कार्यक्रमात अर्शद सय्यद लिखित ‘एक शुरूवात कामयाबी की राह में’ या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. डॉ. रशीद सय्यद, डॉ. तानाजी लाकाळ, फजल शेख, अंजुमन सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, एम. पी. वाघमारे, सुलतान मशायक, इरफान तांबोळी, अभियंता अकबर पठाण, जफर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अर्शद सय्यद यांनी सध्या कोरोना काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीमध्ये निर्माण झालेल्या समस्यांवर कशा पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतो याविषयी विविध उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमत्व विकासाचे महत्व पटवून देऊन यशाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.कार्यशाळेला विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित होते

 
Top