उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्र सरकारच्या कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले होते. या शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन शहीद किसान कलश यात्रा आज उस्मानाबाद येथे दाखल झाली. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतले.

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. जितेंद्र कुमार चोपडे, कॉ. रवी जाधव आणि उस्मानाबाद जिल्हा किसान सभेचे सचिव सुदेश इंगळे यांनी हा अस्थी कलश सोलापूर वरून आज उस्मानाबाद शहरात आणला./सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे चौकात या अस्थी कलश यात्रेस सुरुवात झाली. सिटू अंतर्गत कर्मचारी संघटनेचे सतीश नलावडे आणि त्यांचे सहकारी, स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया उस्मानाबादचे धनराज पवार, डॉ. ओंकार इंगळे, शेतकरी कामगार पक्षाचे धनंजय पाटील, दीक्षित, देशमुख आदी मान्यवरांनी अस्थिकलश यात्रेचे स्वागत केले.

नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा भाई उध्दवराव पाटील स्मारक येथे आली.तेथे कॉ. चोपडे यांनी मार्गदर्शन केले. भाई उध्दवराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बार्शी नाका येथे जनतेने शहीद किसान अस्थी कलशास अभिवादन केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोरील चौकात भाकपचे सुरेश शेळके आणि शेतकऱ्यांनी अस्थिकलशास अभिवादन केले. यावेळी समिती समन्वयक आणि किसान सभेचे जिल्हा सचिव सुदेश इंगळे यांनी भाषण केले. सर्व डाव्या आणि समविचारी पक्ष, संघटनांचे समन्वय समितीने आभार मानले. शहीद किसान कलश यात्रा पुढे लातूरकडे मार्गस्थ झाली.


 
Top