उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्टेट इनोवेशन अँड रिसर्च (सर) फाउंडेशन यांचेमार्फत सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे दिनांक 8 व 9 नोव्हेंबर 2021 या कालावधीत नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स- 2021 संपन्न झाली. या कॉन्फरन्ससाठी राज्याचे साखर आयुक्त मा. शेखर गायकवाड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, थोर शिक्षण तज्ञ मा. ह ना जगताप, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथील आयटी विभागाचे संचालक मा. विकास गरड, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, वाबळेवाडी या नामांकित शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे गुरुजी, सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे, हेमा शिंदे यांच्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणावर उपक्रमशील शिक्षक व शिक्षण प्रेमी उपस्थित होते. या कॉन्फरन्समध्ये देशभरातील उपक्रम शील शिक्षकांच्या उपक्रमाचे सादरीकरण झाले. त्यापैकी निवडक शिक्षकांना नॅशनल लेवल इनोव्हेशन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.

या कॉन्फरन्समध्ये मंगरूळ बीटचे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी श्री मल्हारी माने यांना  शेखर गायकवाड, डॉ. अरविंद नातू, डॉ. शकुंतला काळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत नॅशनल लेवल टीचर्स इनोव्हेशन अवार्ड-2021 प्रदान करण्यात आले. मंगरूळ बीट मधील उपक्रमशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती रंजना स्वामी यांनाही या आवार्ड ने सन्मानित करण्यात आले. यावेळी मंगरूळ बीटच्या यशोगाथा चे सादरीकरण श्री माने यांनी केले.

 श्री माने यांनी मंगरूळ बीटमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद सर फाउंडेशन या संस्थेने घेऊन त्यांना सन्मानित केल्याबद्दल श्री माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

 
Top