उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रकिया सुरु झाली असून प्रचारात रंगत आली आहे. दरम्यान, सत्ताधारी पॅनेलने 15 उमेदवारांचा परिचय आज करुन दिला. आठ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढून बँक सलग 10 वर्षे नफ्यात आहे. यंदा बँकेला 40 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, उपाध्यक्ष वैजिनाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास शिंदे यांनी दिली.
या वेळी आयोजित पत्रकार परिषदेला विद्यमान अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, उपाध्यक्ष वैजिनाथ शिंदे, माजी कार्यकारी अधिकारी वसंत नागदे, माजी अध्यक्ष विश्‍वास शिंदे, आशिष मोदाणी, सुभाष धनुरे, तानाजी चव्हाण आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते. 
श्री. मोदाणी यांनी 11 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा मांडला. ते म्हणाले, की 2011 अखेर बँकेची सभासद संख्या 61 हजार 90 होती. आता ती 73 हजार 456 इतकी आहे. तेव्हा भागभांडवल 24 कोटी 52 लाख होते आता ते 61 कोटी 99 लाख रुपये आहे. 95 कोटी 37 लाखांच्या निधीवरुन आता 310 कोटी 95 लाखापर्यंत वाढ झाली आहे. तेव्हा बँकेच्या 617 कोटी 20 लाखांच्या ठेवी होत्या. आता त्या 1754 कोटी 8 लाखांपर्यंत गेल्या अहेत. आठ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढून या आर्थिक वर्षाअखेर बँक 40 कोटी रुपयांनी नफ्यात आहे. पूर्वी 329 कोटींची गुंतवणूक होती. आता ती 1 हजार पाच कोटींवर पोचली आहे. सभासदांच्या विश्‍वासास पात्र राहून 11 वर्षे कामकाज पाहिले आहे. एक वर्ष कोरोनामुळे राज्य सरकारकडून मुदतवाढ मिळाली होती. मराठवाड्यातील उस्मानाबादसारख्या जिल्ह्यातील ही एकमेव बहुराज्यीय बँक असून 25 शाखा स्वमालकीच्या आहेत. सभासदांच्या विश्‍वासास पात्र राहूनच कामकाज केले आहे. बँकेत राजकारण होत नाही. सर्वांनाच समान न्याय दिला जातो. त्यामुळे आमचा पॅनेलही सर्वपक्षीय आहे. विरोधकांनी सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी भाजपचे मूळ नेते यावर बोलले तर सभासदांना सत्य कळेल, अशा शब्दात विश्‍वास शिंदे यांनी विरोधी पॅनेलचा समाचार घेतला.
 
Top