स्वताच्या भूमिकेपासून काढावा लागला पळ..

आता उस्मानाबाद करांची माफी मागणार का ठालेपाटील..?

 


माय मराठीची सेवा करत असलेल्या अनेक संघटना आहेत,ज्या विविध स्तरावर आपापल्यापरीने मराठी भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींसाठी कार्य करतात. त्यामध्ये कार्यशाळा घेणे, स्पर्धा आयोजित करणे, साहित्य पुरस्कार देऊन गौरव करणे, साहित्य संमेलन आयोजन करणे व इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. अर्थात अशी मंडळी साहित्य सेवेला वाहून घेत असल्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असेही काही नसते म्हणूनच समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापारी,औद्योगिक, क्षेत्रातील दानशूर मंडळी कडून अर्थसहाय्य घेऊन माय मराठीची सेवा केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने राजन खान यांची अक्षर मानव संघटना असेल, शरद गोरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, प्रा.गंगाधर पानतावणे यांनी सुरू केलेलं अस्मितादर्श साहित्य संमेलन, किशोर ढमाले यांचे विद्रोही साहित्य संमेलन, राकेश वानखेडे यांचा प्रगतशील लेखक संघ, गुराखी साहित्य संमेलन, रानफुल साहित्य व्यासपीठ, व अशा इतरही अजून विविध संघटनांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. व या सर्व संघटना पैकी एक सोडली तर सर्व संघटना शक्यतो स्वतःच्या खिशाला झळ लावून तर कधी दानशूर मंडळी यांच्या सहकार्याने माय मराठीची सेवा करत आहेत. फक्त एकच संघटना  जी स्वतःला शिखर संघटना म्हणवून घेते ती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ शासनाकडून 50 लक्ष रुपये घेऊन साहित्य संमेलनाचे आयोजन करते, व किरकोळ 50 लाखात भागत नसल्यामुळे विविध संस्था, पदाधिकारी, दानशूर मंडळी कडून अंदाजे करोडो रुपये जमा करण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यास स्थानिक आयोजकांना सुचवले जाते, मग यातून शाळेतील शिक्षक, लहान लहान मुले देखील सुटत नाहीत. कारण त्यांना संमेलन दर्जेदार वगैरे करायचे असते. आणि हे देखील सर्वजण ठरेल त्यानुसार गपगुमान पैसे देत असतात, यात हे संमेलन आपल्या गावात होत आहे हा एक आविर्भाव निर्माण केला जातो, काहींना खरोखर अभिमान होतोही, आणि एक मोठा वर्ग असतो ज्यांना कोणीतरी ‘वरून’ आदेशित केलेले असते त्यानुसार “हाक ना बोंब..” या उक्तीप्रमाणे पैसे देऊन रिकामा झालेला असतो. जिथे संमेलन असते त्या भागातील विविध पुढारी, नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची ही इज्जत वगैरे पणाला लागलेली असते असा भास निर्माण केला जातो आणि त्यांच्यामार्फत ही आर्थिक सह सर्व यंत्रणा, मनुष्यबळ रात्रंदिवस कामाला जुंपले जातात कारण माय मराठीची सेवा करायचे असते आणि आपली इज्जत राखायची असते. संमेलनादरम्यान मदत करणाऱ्या पैकी किमान काहींचा तरी मंचावर सन्मान करून, तुमच्यामुळे हे संमेलन यशस्वी व भव्यदिव्य होत आहे म्हणून ऋण व्यक्त करून उतराई व्हायचे असते, तसे यापूर्वीही केलेले होते.

    मात्र उस्मानाबादला घेण्यात आलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरम्यान वेगळाच अनुभव ठालेपाटलांनी दाखवला. सुरुवातीला तर अर्थसाह्य पासून यंत्रणा पर्यंत सर्व फंडे वापरून घेतले, आणि अगदी शेवटी ‘साहित्यामध्ये राजकारण्यांचं काय काम..?’ म्हणत मदत केलेल्या सर्व लोकप्रतिनिधींपैकी एकालाही ना पत्रिकेत, ना मंचावर कुठेही स्थान दिले नाही. चक्क अपमान केला गेला ठाले पाटलाकडून सर्व लोकप्रतिनिधींचा. शहराचा प्रथम नागरिक,आमदार, मंत्री खाली आणि अधिकारी मंचावर असे चित्र होते. अधिकारी मंचावर असण्याबाबत ही कुणाची हरकत असण्याचे काही कारण नाही,कारण त्यांनीही संमेलन यशस्वी होण्यासाठी मदत केलेलीच असते.परंतु लोकप्रतिनिधींचा अपमान कशासाठी? लोकप्रतिनिधी हे तिथल्या नागरिकांनी निवडून दिलेले त्यांचे प्रतिनिधी असतात, म्हणजे एका अर्थाने हा जनतेचा अपमान नाही का झाला ?शासनाच्या ज्या खात्यामार्फत संमेलनासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी घेतला जातो त्या खात्याचे मंत्री महोदय सुद्धा खाली बसवले होते ! हा माज नाही तर काय म्हणायचे मग ? लोकप्रतिनिधी आणि साहित्य हे दोन्ही घटक एकमेकांपासून वेगळे कसे असू शकतात ? लोकप्रतिनिधी दररोज नवनवे साहित्य रोजच्या अनुभवातुन वाचत असतो, त्या अनुभवांनाच कल्पनेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचे काम साहित्यिक करत असतात.लोकप्रतिनिधी जनतेच्या वेदनांवर उपाययोजनांच्या माध्यमातून मलम लावण्याचे कार्य करतो, तर साहित्यिक याच वेदनांवर  आपल्या शब्द सामर्थ्याने फुंकर घालण्याचे काम करत असतात. समाज सुधारणा आणि प्रबोधन हे दोघांचेही समान उद्दिष्ट असेल तर मग लोकप्रतिनिधींचा विटाळ ठालेपाटलांना  व्हायचे काय कारण ? परंतु तरीही ठालेपाटलांनी त्याचं लंगड समर्थनच केलं होतं. याउलट लोकप्रतिनिधींनी मात्र उदार व सामंजस्याची भूमिका घेतली होती. आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात माय मराठीचा जागर होतोय ही भावना उरात ठेवून वैयक्तिक मानापमानाला बाजूला सारून संमेलनाला यत्किंचितही गालबोट लागू दिले नाही.

 कारण लोकप्रतिनिधी नेहमीच साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राचा व त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा आदर सन्मान करत आलेले आहेत व नेहमीच करत असतात. नेमके याच आदराच्या भावनांचा गैरवापर ठालेपाटलांसारख्या प्रवृत्ती कडून करणे हे कदापि समर्थनीय होऊच शकत नाही.

    94 वे संमेलन नाशिक येथे जाहीर केल्यानंतर उस्मानाबाद येथील कटु अनुभव तेथील कोणाला येऊ नये म्हणून माझ्या  संपर्कातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील जेवढे काही  होते त्या सर्व मंडळींना मी ठाले-पाटील यांच्या या कार्यशैली विषयी अवगत करून ‘कामापुरता मामा’ न होऊ देणे बाबत कल्पनाही दिली होती. साहित्य पथावरील सच्चा वारकरी या नात्याने माझ्या परीने अल्प का असेना, मात्र या प्रवृत्तीला विरोध करून उघड पाडण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि यापुढेही करत राहणारच आहे.

    ठालेपाटलांच्या शैलीनुसार संमेलन अवघ्या काही दिवसांवर आल्यानंतरच कार्यक्रम पत्रिका बाहेर  काढायची, याप्रमाणेच आताही घडले आहे.विशेष म्हणजे पत्रिकेत माझ्या माहितीप्रमाणे 12 पुढाऱ्यांची नावेही छापलेली आहेत. म्हणजेच ठाले पाटलांनी त्यांच्या भूमिकेपासून माघार घेतली आहे. स्पष्टच सांगायचे तर पळ काढला आहे. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की हा नियम फक्त उस्मानाबाद पुरताच केला होता का ? आणि म्हणून ठाले पाटील उस्मानाबादकरांची आता माफी मागणार का ?

   बाकी नाशिकचे संमेलन सुद्धा अगदी थाटातच पार पडणार यात शंकाच नाही. कारण आता ते नाशिककरांच्या अस्मितेचा विषय असतो आणि अवघे नाशिककर हे संमेलन पालखीचे भोई बनलेले असतात.महामंडळ वगैरे फक्त निमित्त असतं.


   - युवराज नळे

साहित्यिक,तथा नगरसेवक, उस्मानाबाद.

९६२३८५९५११

 
Top