बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या बँकेसाठी नागदे-मोदाणी व सुधील पाटील यांचे पॅनल आमनेसामने

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची तब्बल 20 वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया होत आहे. शुक्रवारी दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. पाच जिल्ह्यांसह कर्नाटकात 30 शाखांसह विस्तारलेल्या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी नागदे-मोदाणी-शिंदे पॅनेलचे उमेदवार व विरोधी सुधीर पाटील पॅनेलचे उमेदवार सभासद मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तर दुसरीकडे 154 मतदान केंद्रांवर बँकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाची यंत्रणा रात्रंदिवस तयारी करत आहे. 

उस्मानाबादसह सोलापूर, बीड, लातूर व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात विस्तारलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने मागील दहा वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे राज्यात नावलौकीक मिळविला आहे. गेल्या अकरा वर्षापासून बँक नफ्यात असून सभासदांना 8 टक्के लाभांश वाटला जात आहे. तब्बल 20 वर्षानंतर पहिल्यांदाच विरोधक निर्माण झाल्याने सत्ताधारी मोदाणी-नागदे-शिंदे पुरस्कृत उमेदवारांनीही सत्ता टिकविण्यासाठी खुले आव्हान विरोधकांना दिले आहे. त्यामुळे लागलेल्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था कार्यालयाची टीम रात्रंदिवस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. येत्या 19 नोव्हेंबरला सकाळी 8 ते 5 या वेळेत पाच जिल्ह्यातील 154 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी 67 हजार 821 मतदार आहेत. मात्र त्यापैकी किती मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार, हे मतदानादिवशीच समजणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. 

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार विभागांतर्गत असलेल्या विविध संस्था, सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघातील कर्मचार्‍यांची मदत घेतली जात आहे. कमी पडल्यास निवडणुकीत काम केलेल्या शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. जवळपास एक हजार निवडणूक कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले जात आहेत. त्यांना मतदान प्रक्रिया व त्याअनुषंगिक बाबींचे तांत्रिक प्रशिक्षणाचे व्हिडीओ मोबाइलद्वारे पाठविण्यात येणार आहेत. या कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी विविध वाहनांची सोय करण्यात आली असून 154 मतदान पेट्या, मतदान कक्षातील कर्मचारी व बंदोबस्तासाठी पोलीस मतदान केंद्रावर एक दिवस अगोदर त्या ठिकाणी  पोहोचणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी सात बॅलेट पेपर असणार आहेत. मतदारांनी बॅलेट पेपरवरील उमेदवारनिहाय असलेल्या निवडणूक चिन्हावर फुलीचा शिक्का मारून आपले मत नोंदावयाचे आहे. एका मतदाराला 14 उमेदवारांना मतदान करता येणार असल्याने प्रत्येक मतदाराला 14 शिक्के मारावे लागणार आहेत.

उमेदवारांनी साधला मतदारांशी संपर्क

उस्मानाबाद जनता बँकेसाठी नागदे-मोदाणी-शिंदे पुरस्कृत विकास पॅनल व सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल यांच्यामध्ये लढत होत आहे. बँकेच्या सभासद मतदारांशी उमेदवारांनी मोबाईलद्वारे व प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन संपर्क साधला आहे. कर्मचारी, सभासदांच्या हितासाठी आमच्याच पॅनलला मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था मोडीत निघालेल्या असताना नागदे-मोदाणी यांच्या ताब्यात असलेली एकमेव सहकारी बँक चांगल्या स्थितीत असल्याने मतदार विचार करून मतदान करतील, अशी आशा सत्ताधारी गटाच्या पॅनेलचे उमेदवार व्यक्त करीत आहेत.

 
Top