उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतकऱ्यांचा आधारवड ठरलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जनरेट्यामुळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे विक्रीकर कार्यालय उस्मानाबाद यांची ७५ कोटी २७ लाख ७१ हजार ३४६ रुपयांची थकबाकी असून या थकबाकी पोटी तेरणा साखर कारखान्याच्या गट क्र. २४२, २७२, २७३, २७४, २७७, २७८, २७९, ७९५, ७९६, ७९७ व ७९८ या जमिनीवर बोजा नोंद करण्याचे पत्र सहाय्यक राज्यकर आयुक्त, वस्तू व सेवा कर कार्यालय उस्मानाबाद यांनी दिले आहे. विक्रीकर कार्यालयाच्या वसुली प्राप्त रकमेची नोंद सातबारावर घेऊन सातबारा उतारे तात्काळ सादर करावे असे स्मरणपत्र ढोकी तलाठी  यांना दिले आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे या कारखान्यावर नवीन संकट उभा ठाकल्याने भाडे तत्वाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर हे दुसरे कृत्रिमरुपी बोजाचे संकट ओढवले आहे.

तेरणा कारखान्याच्या मालमत्तेवर ५१ कोटी व त्यावरील व्याज याची नोंद घेण्याचे पत्र २०१६ रोजी १२ जुलै २०१६ रोजी दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पत्र विक्रीकर कार्यालयाने जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिले आहे. 

अगोदरच कर्जबाजारी असलेल्या तेरणा कारखान्याच्या थकित कर्जात आता विक्री कर विभागाच्या ७५ कोटी रुपयांच्या वसुलीची नोंद होणार असल्याने तेरणा कारखाना सुरू करण्यापूर्वीच हे नवीन संकट ओढल्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळणार असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या संकटावर राजकीय मंडळी कशी मात करते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.


 
Top