उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील कोरोना स्थिती सध्या आटाेक्यात आली असून विविध राजकीय मेळावे ,जाहीर सभा आणि धार्मिक कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व आठवडी बाजार भरवण्यास परवानगी देण्याची मागणी अॅड. रेवण भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कोरोना विषयक नियमांच्या अटी घालून दिलेले असतानाही प्रचंड गर्दी एकत्र जमवत उल्लंघन केले जात आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना सरसकट परवानगी दिली जात असेल तर आठवडी बाजारा वरच बंदी का? सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापारी यांचे अर्थकारण आठवडी बाजारावर अवलंबून असते, मात्र कोरोनामुळे बंद करण्यात आलेले बाजार अद्यापही सुरू झालेले नाहीत. दर रविवारी उस्मानाबाद येथे आठवडी बाजार भरवला जातो मात्र प्रशासनाने बंदी घातल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकावर गल्लीबोळात फिरून भाजीपाला व अन्य साहित्य विक्री करण्याची वेळ आली आहे. सध्या सण उत्सवांचे दिवस आहेत. दिवाळी तोंडावर असून हजारो मजूर जिल्ह्यातून स्थलांतरित होतात ,त्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार भरविणे गरजेचे आहे,त्यामुळे आता तातडीने जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार भरविण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. 


 
Top