कारखाना हा सामुदायिक प्रपंच, सभासद  ऊस उत्पादक शेतकरी यांनी अभ्यास करणे काळाजी गरज


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील अरविंदनगर (केशेगाव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कृषि भूषण धनंजय भोसले व  सुनीता भोसले, सदाशिव कोळगे व मंदाकिनी कोळगे,  यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा होवुन संपन्न झाला. कार्यक्रामाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे हे होते.

यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखान्याची वाटचाल ही सुरवातीपासुनच प्रतिकुल परिस्थितीतून गेली आहे. आपल्याकडे निसर्गाचे संकट हे नेहमीच असल्याने मधल्या काळात मागील ५ वर्षात पाण्याची उपलब्धता नसल्याने कारखान्याला अनेक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. तसेच सध्या साखर कारखानदारी आर्थीक अडचणीत असताना देखील त्यातून मार्ग काढत चालु हंगाम क्षमतेप्रमाणे चालविणेचे नियोजन केले आहे. चालु हंगामासाठी १५ हजार हेक्टर ऊसाची नोंद आली असून हेक्टरी ८० मे. टन सरासरी ऊस उत्पादन गृहीत धरले तर एकूण १२ लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. त्यापैकी इतर विल्हेवाट जाता १६० दिवसात ९ लाख मे. टन गाळप होईल. चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची व घटकाची बारकाईने नियोजन केले असून उपलब्ध यंत्रणेमार्फत नोंदविलेला ऊस आणण्यासाठी गावनिहाय ऊस तोडणी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच काखान्याने लागण नोंदी व ऊस तोडणी कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने केल्याने त्यामध्ये सुसत्रता येणार आहे. सरकारच्या बदलत्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले आहे. पुढे बोलताना गोरे म्हणाले की, आपण कारखाना हा सामुदायिक प्रपंच म्हणून चालवतो. त्यामुळे कारखाना अडचणीत असताना सुध्दा पुढील दिशेला वाचटचाल करीत आहे. तसेच कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्यास ऊस विकासाचे मळावे घेण्याचे नियोजन केले आहे. पावसाच्या परिस्थितीचा विचार करता आपण गाळप हंगाम २६ आक्टोंबर रोजी सुरु करण्याचा विचार करत असून यात आपल्या सर्व सभासद, कर्मचारी, ऊस तोड / वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करुन कारखान्याची पुढील वाटचाल यशस्वी करु असे प्रतिपादन केले.

प्रस्ताविक कारखान्याचे संचालक ऍड. चित्राव गोरे यांनी सविस्तर केले तर प्रमुख पाहुणे धनंजय भोसले यांनी उपस्थित सभासद शेतकरी यांना ऊस उत्पादन व खोडवा व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संचालक ऍड. निलेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, ऊस तोड, वाहतुक ठेकेदार, हितचिंतक, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top