उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेत काही वर्षांपूर्वी घडलेल्या विद्युतीकरणाच्या घोटाळ्याच्या चौकशीची संचिका गायब झाली आहे. परंतु वर्ष झाले तरी संचिका मिळत नसल्यामुळे आनंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता ही संचिका कोणाला वाचवण्यासाठी कोणी गायब केली, याचा छडा पोलिस तपासात लागण्याची अपेक्षा आहे.

गतवर्षी विद्युतीकरणाच्या कामामध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार अन्नय्या स्वामी यांच्याकडून करण्यात आली होती. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी केली होती. चौकशी पूर्ण झाल्यावर याची संचिका तयार करण्यात आली होती. बांधकाम विभागात ही संचिका होती. मात्र, दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संचिका गहाळ झाली. विद्युतीकरणाच्या अपहाराच्या अनुषंगाने यामध्ये महत्त्वाची कागदपत्र होती, असे समजते. त्यानंतर ही संचिका जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कोणालाच सापडली नाही. तक्रारदारांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, अपहारासंदर्भात कारवाईच होत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून बांधकाम विभागातील वरिष्ठ कर्मचारी बळीराम सोपान मोरे यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी संचिका गहाळ झाल्याची नोंद घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत.

 
Top