मंत्रालयातील बैठकीत पालकमंत्री शंकरराव गडाखा यांनी व्यक्त केला विश्वास


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा तसेच बेनीतुरा नदीवरील अस्तित्वातील नादुरूस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधारे (बॅरेज) मध्ये रुपांतर करण्यासाठी जिल्ह्यातील जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता यांची मंत्रालयात दि.22 ऑक्टोबर 2021 रोजी सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली होती.                                    

या बैठकीमध्ये मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा नदीवरील निवडक एकूण चोवीस कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यां (बॅरेज) मध्ये रुपांतर करण्यासाठीची माहिती संबंधित विभागाकडून सादर करण्यात आली.मंत्रालयातील बैठकीमध्ये दिलेल्या आदेशानुसार आणि कामाची माहिती करुन घेण्याच्या दृष्टीने दि.21 ऑक्टोबर 2021 रोजी मांजरा नदीवरील पारगाव कोल्हापुरी बंधारा, बहुला कोल्हापुरी बंधारा, खोंदला कोल्हापुरी बंधारा या योजनांना क्षेत्रावर भेट देऊन पाहणी केली आणि कामे सुरु करण्याच्या दृष्टीने कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून या सर्वेक्षणास निधी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी ही कामे होणार आहेत. तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी आवश्यक ते सहकार्य संबंधित अधिकारी यांना करावे अशा सूचनाही श्री.गडाख यांनी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांना केल्या.

या योजनेअंतर्गत मांजरा नदीवरील वाशी तालुक्यातील पारगाव ते कळंब तालुक्यातील भाटसांगवी या परिसरातील एकूण जवळपास 40 कि.मी. अंतरामध्ये एकूण 12 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सविस्तर सर्वेक्षणाअंती ज्या योजना नियमाप्रमाणे बसतील त्यांचे सविस्तर अंदाजपत्रके मंजूर करुन कामे करण्यात येतील. तेरणा नदीवरील एकूण 8 योजनांचे सविस्तर सर्वेक्षण करण्याची प्रस्तावित आहेत. तसेच बेनीतुरा नदीवरील चार योजना प्रस्तावित आहेत.

या सर्व प्रस्तावित योजना पूर्ण करण्यासाठी जवळपास 200 कोटीच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. या योजनेमुळे मांजरा नदी काटावरील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तेरणा नदीवरील कामामुळे उस्मानाबाद आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या एकूण 24 योजनांमुळे 11 दशलक्ष घ.मी. पाणीसाठा होवून 3 हजार 500 हेक्टर सिंचन क्षमता पुन:स्थापित होणार आहे. या योजनेमुळे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे मत श्री.गडाख यांनी यावेळी व्यक्त केले.

 ही योजना पालकमंत्री गडाख यांनी लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवरील बॅरेज योजनाच्या धर्तीवर प्रस्तावित केली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील  मांजरा नदीत पूर्ण लांबीमध्ये पाणी थांबणार आहे. तसेच तेरणा नदीमध्ये तेरणा मध्यम प्रकल्पाच्या खालील बाजूपासून ते निम्न तेरणा धरणाच्या फुगवट्या पर्यंत पाणी थांबणार आहे.

 या दौऱ्यादरम्यान जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, सभापती दत्ता अण्णा साळुंखे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जीवन काकडे, तसेच तालुका आणि गाव स्तरावरील पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top