कळंब / प्रतिनिधी-

कळंब शहरातील सर्व्हे नंबर ११० मधील जमिनीचे बनावट कागदपत्रे खरे भासवून त्या आधारे खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश कळंब न्यायालयाने कळंब पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे या जमिनीवरील भूखंडाची खरेदी केलेल्यामध्ये मोठी  खळबळ उडाली आहे.

याबाबत अमित प्रदीपचंद्र लोढा यांनी कळंब न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. शहरातील मोहा रोड भागातील सर्व्हे नंबर ११० मधील ३ एकर २२ गुंठे जमीन ही त्यांच्या व कुटुंबीयांच्या मालकीची असताना चंद्रकला शिवाजी मदने, महादेवी शिवाजी मदने, महादेव शिवाजी मदने, मनीषा शिवाजी मदने यांनी त्या मिळकतीचे मालक नसताना बनावट कागदपत्रे तयार केले. ते खरे आहेत असे भासवून जमीन सर्व्हे नंबर ११०च्या सातबारावर चुकीच्या पद्धतीने नाव असल्याचा फायदा घेऊन जवळपास

१३ लोकांना खरेदीखत करून दिल्याचे लोढा यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते. कळंब येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. डी. ठोंबरे यांनी फिर्याद व त्यासोबतच दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करून व फिर्यादीचे विधिज्ञ आर. आर. शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कळंब पोलीसांना दिले असल्याची माहिती अॅड. आर. आर.  शिंदे यांनी दिली आहे.


 
Top