कळंब / प्रतिनिधी-

मेघा इंजिनिअरिंग कंपनीने मंजुरीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसुल प्रशासनाने ४० कोटी रुपयांचा दंड केला अाहे. मात्र कारवाई हाेऊन अनेक दिवस झाले तरी कंपनीने अद्याप दंड भरलेला नाही. खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यातील केज ते कळंब-येरमाळा-कुसळंब हा साधारण ६१ किलोमीटर रस्ता मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी करत आहे. कामासाठी गौण खनिज आवश्यक असल्यामुळे कंपनीने एक लाख १४५ ब्रास मुरूम दगड खोदकाम करण्यासाठी तालुक्यातील मस्सा (खं) परिसरातील चार सर्व्हे नंबरमधून गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी कंपनीने घेतली होती. 

 परंतु येथे परवानगीपेक्षा अधिक खनिज उत्खनन करण्यात आले. यावर महसूल प्रशासनाच्या वतीने संबंधित कंपनीला नोटीस काढण्यात आली होती. त्यानंतर संबंधीत कंपनीने पुन्हा हासेगाव, येरमाळा, मस्सा आदी भागात अनेक सर्वे नंबरमध्ये खोदकाम करून अधिकचे म्हणजे ७० हजार ५९७ ब्रास जास्तीचे गौण खनिज उत्खनन केल्याचे महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले. तत्कालीन ब्रास चारशे रूपये किमतीप्रमाणे २ कोटी ८२ लाख ३९ हजार १६ रुपये शासनाच्या खाती जमा करण्याचे आदेश १० जून २०२१ रोजी कळंबचे तत्कालीन तहसीलदार रोहन शिंदे यांनी काढले होते. मात्र यावर पुढे काहीच झाले नाही.


 
Top