काटी/ उमाजी गायकवाड

तुळजापूर येथील पापनास गल्लीत राहणारा व कृषी उत्पन्न बाजार समितीत मारुती (राया) शिंदे यांचेकडे हमाली काम करणारा 20 वर्षीय अविनाश सुधीर जमादार यांचे अवघं आठवी पर्यंत शिक्षण झाले. घरात अठरा विश्व दारिद्र्य आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची वडिल सुधीर सिद्राम जमादार मजुरी करतात. तर आईपण मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करते. अविनाश जमादार हा सुरुवातीपासूनच मानसिकदृष्ट्या विकलांग आहे.

“ज्याला गणित कळले, त्याला आयुष्याचे गणित जमले” असे म्हणतात. सर्वात जास्त अवघड विषय म्हणून अनेक विद्यार्थी गणिताच्या नावाने नाक मुरडतात. परंतु आठवी पर्यंत शिक्षण झालेल्या तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाली काम करणाऱ्या अविनाशचे गणितातील अगाध ज्ञान पाहून शेजारील आडत दुकानदार अमर माने यांनी त्याचा  व्हीडिओ व्हायरल केला. 

या व्हीडिओला महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्धी मिळाली. विविध नामांकित टि.व्ही. चॅनलने याची बातमी करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला. अविनाश हा लहानपणापासून विकलांग व खोडकर असल्यामुळे त्यास इतर विद्यार्थी चिडवायचे, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यामुळे त्याने आठवीतून शिक्षण बंद करून पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करुन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करुन पोत्याचे ओझे पाठीवर घेऊन मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना हातभार लावत आहे. अविनाश हा आपल्या विकलांगाने व परिस्थितीमुळे जरी शाळेत कच्चा असला तरी तो गणितात मात्र पक्का आहे. तो बे पासून कोटी, अब्ज, खर्व,नील, शंक,पद्मपर्यंतचे पाडे अगदी तोंडपाठ आहेत. त्याचे गणितातील ज्ञान पाहून कुठल्याही शिक्षक, प्राध्यापकासह अनेक जण आश्चर्य चकित होत आहे. तो कुठल्याही संख्येची बेरीज, वजाबाकी, भागाकार अगदी काही सेकंदात तोंडपाठ सांगतो. त्याचे गणितातील अगाध ज्ञान पाहून अनेक टि.व्ही. चॅनलनी दखल घेतली. राज्यासह परराज्यातून कौतुक होत आहे. अनेकजण भेट देऊन कौतुकाची थाप टाकत आहेत. त्यास मराठीसह हिंदी,कन्नड भाषा सुध्दा अवगत आहे. कन्नड, मराठी चित्रपटातील गाणी तोंड पाठ आहेत.अविनाशला हिंदी चित्रपटसृष्टीतील अजय देवगण, सलमान खान तर कन्नड चित्रपटसृष्टीतील शिवराज, दर्शन, व अप्पो हि हिरो आवडतात व त्याना भेटण्याची इच्छा तो व्यक्त करतो.

अविनाश हा अतिशय निरागस असून त्याच्या गणितातील चमत्कारामुळे सर्व आडतदुकानात सर्वांच्या आवडता आहे. जसजसा तो मोठा होत आहे. घरची हलाखीची परिस्थिती व वयोवृद्ध आई-वडिलांना हातभार लावताना त्याच्या 20 वर्षातच मोठी जबाबदारी पडली असून विकलांग असलेल्या अविनाश जमादार याच्या गणितेय ज्ञानाचा व त्याच्या बुध्दीमत्तेची शासनस्तरावर दखल घेऊन त्याचा वैद्यकीय खर्च व त्याच्या कुटुंबीयांना मदत करुन त्याचे पाठीवरील दप्तराचे ओझे जरी कमी झाले असले तरी त्यांच्या पाठीवरील हमालीचे पोते उतरावे अशी माफक अपेक्षा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमर माने यांनी व्यक्त केली आहे.


 
Top